जगात कार्बन उत्सर्जन जास्त प्रमाणात होण्यास भारत व चीन हे जबाबदार असून या जागतिक आव्हानांवर तोडगा काढण्यासाठी या देशांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे हवामान बदलांच्या परिणामांनी मेटाकुटीस आलेल्या अमेरिकेने म्हटले आहे. प्रत्यक्षात जास्त कार्बन उत्सर्जन अमेरिकाच करीत असून त्यांनी त्याबाबत भारत व चीन या देशांना जबाबदार ठरवले आहे. व्हाइट हाऊसचे प्रसिद्धी सचिव जे कार्नी यांनी सांगितले की, जे देश जास्त कार्बन उत्सर्जन करतात त्यांनी हवामान बदलाच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी तेवढय़ाच हिरिरीने वाटा उचलला पाहिजे.
अमेरिकेच्याच एका अहवालात हवामान बदलांमुळे वाढणारे तापमान व वाढती सागरी जलपातळी, लहरी हवामान याबाबत उपाययोजना करण्याचे आवाहन केले होते त्याबाबत भारत-चीन यांच्या भूमिकेबाबत विचारलेल्या प्रश्नावर कार्नी यांनी वरील उत्तर दिले. कार्नी यांनी सांगितले की, अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा हित  हे ऊर्जा आयात कमी करण्यातच आहे. हवामान बदलांचे परिणाम हवामानावर फार गंभीरतेने होत आहेत. जगातील ९७ टक्के वैज्ञानिक हे हवामान बदल कार्बन उत्सर्जनामुळे होत असल्याचे मान्य करीत आहेत व मानवी कृतींमुळे हे घडत असल्याचे सांगत आहेत. त्यांचे म्हणणे नाकारण्याने आपल्या देशाला, अर्थव्यवस्थेला किंवा अमेरिकी जनतेला काही फायदा होणार नाही. अमेरिके त पोलर व्होर्टेक्समुळे अनेक ठिकाणी हिमपात झाला.
हिवाळाही फार तीव्र गेला. त्याचा परिणाम एकूण देशांतर्गत उत्पन्नावर झाला, हा निष्कर्ष केवळ अमेरिकेत काढण्यात आला अशातला भाग नाही, इतर अर्थशास्त्रज्ञ, स्वतंत्रपणे काम करणारे तज्ज्ञ यांनीही तोच निष्कर्ष काढला आहे, पण त्याच्याशी कुणी सहमत व्हायला तयार नाही.