18 September 2020

News Flash

चीनची पूरग्रस्त नेपाळला १० लाख डॉलरची मदत

चीनने नेपाळशी आणखी जवळीकता वाढवली आहे

नेपाळमधील पूरग्रस्त भागात ग्राहकाच्या प्रतिक्षेत असलेला दुकानदार (AP Photo/Anupam Nath)

नेपाळमध्ये पुराने हाहाकार माजला असून गेल्या तीन दशकातील सर्वांत मोठा पूर असल्याचे बोलले जाते. पुरामुळे मृत पावणाऱ्यांची संख्या ११५ इतकी झाली आहे. चीनने याचाच फायदा घेत नेपाळला मोठी मदत केली आहे. भारताबरोबरील संबंधात एकीकडे कटुता असताना त्याचवेळी नेपाळशी मात्र त्यांनी आणखी जवळीकता वाढवली आहे. नेपाळच्या मदतीसाठी चीनने सुमारे १० लाख डॉलर (६.४ कोटी) दिले आहेत. चीनचे उपराष्ट्राध्यक्ष वांग यांग यांनी तत्काळ मदतीसाठी ही रक्कम दिल्याचे सांगितले. चीनने नेपाळबरोबर मोठे करार ही केले आहेत. यामुळे दोन्ही देशातील संबंध पूर्वीपेक्षाही आणखी मजबूत होतील. नेपाळ आणि चीनदरम्यान पेट्रोलियम, गॅस आणि खाण क्षेत्रासाठी दोन अब्ज डॉलरची योजना, २०१५ च्या भूकंपात नुकसान झालेल्या आरनिको महामार्गाच्या पुननिर्मिती आणि केरूंग-रासुवागार्ही रस्त्याच्या निर्मितीसाठी १५ अब्ज डॉलरच्या योजनेसाठी करार केले आहेत.

चीन आणि नेपाळदरम्यान भविष्यात गुंतवणूक वाढवण्यावर सहमती झाली आहे. चीनने पूरग्रस्तांच्या मदतीसाठी नुकसानीचे सर्व्हेक्षण करण्याचीही वाट पाहिली नाही. उपराष्ट्राध्यक्ष वांग यांनी नेपाळच्या शाही महलचे उद्घाटन केले. शाही महलचेही भूकंपात नुकसान झाले होते. भूकंपाच्या दोन वर्षांनंतर चीनने या शाही महलच्या दुरूस्तीसाठी आर्थिक मदत दिली होती. वांग यांनी नेपाळचे माजी पंतप्रधान के.पी.ओली आणि पुष्प कमल दहल प्रचंड यांचीही भेट घेतली होती.

वर्ष २०१५ मध्ये भूकंपात काठमांडू ते तातोपानीपर्यंतचा सुमारे ११४ किमी लांबीच्या महामार्गाचे विविध ठिकाणी मोठे नुकसान झाले होते. या महामार्गाच्या दुरूस्तीसाठी चीनने ७६ कोटींची मदत दिली होती. चीनच्या चायना रेल्वे सिसुगु समूहाने हा महामार्ग दुरूस्त केला आहे.

अरानिको महामार्गाची निर्मिती चीननेच १९६० मध्ये केली होती. नेपाळ मे महिन्यात चीनच्या बेल्ट अँड रोड इनिशिएटीव्हमध्ये (बीआरआय) सहभागी होणार आहे. त्यानंतर चीनने काठमांडूपर्यंत रेल्वे जाळे विस्तारण्याचा मानस व्यक्त केला आहे. वांग यांनी मंगळवारी नेपाळ-चीनचे उपपंतप्रधान स्तरावरील बैठकीदरम्यान ही घोषणा केली. नेपाळला मदत करून चीन भारतावर दबाव निर्मितीचाही प्रयत्न करत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 16, 2017 1:27 pm

Web Title: china announces 1 million dollar aid for flood hit nepal india
Next Stories
1 सुपरबाईक रेस बेतली जीवावर; अपघातात तरुण ठार
2 ‘रोहित वेमुला दलित नव्हता, वैयक्तिक कारणामुळेच आत्महत्या’
3 केरळमधील लव्ह जिहाद प्रकरणाचा तपास करा; सुप्रीम कोर्टाचे ‘एनआयए’ला आदेश
Just Now!
X