चिनी लष्कराची नवी दर्पोक्ती; भारताला समज

डोकलाम हा वादग्रस्त भाग असल्याबाबत भारताच्या लष्करप्रमुखांनी केलेल्या वक्तव्यावर टीका करतानाच, डोकलाम हा चीनचाच भाग असल्याचे चीनच्या लष्कराने गुरुवारी सांगितले. डोकलाम येथील ७३ दिवसांच्या तिढय़ापासून धडा शिकून भारताने भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती टळावी, असा सल्लाही त्यांनी दिला.

भारताने पाकिस्तानलगतच्या सीमेवरून आपले लक्ष चीनकडील सीमेवर केंद्रित करण्याची आवश्यकता असल्याचे सांगतानाच, प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर चीन दबाव वाढवत असल्याचा उल्लेख लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत यांनी या महिन्याच्या सुरुवातीला म्हटले होते. डोकलाम हा चीनचाच भाग आहे, असे चीनच्या संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते कर्नल वू क्विआन यांनी जनरल रावत यांच्या वक्तव्यावर प्रथमच प्रतिक्रिया देताना पत्रकारांना सांगितले. भारतीय फौजांनी या भागात अवैध घुसखोरी केली होती, हे या वक्तव्यावरून दिसून आल्याचे ते म्हणाले.

डोंगलाँग (डोकलाम) हा चीनचाच भाग आहे. या भागात झालेल्या घटनेपासून भारताने धडा घेऊन अशा घटनांची पुनरावृत्ती टाळावी, असेही वू म्हणाले. वादग्रस्त भागात रस्त्याचे बांधकाम करणाऱ्या चिनी लष्कराला भारतीय फौजांनी रोखल्यानंतर, गेल्या वर्षी १६ जून ते २८ ऑगस्ट असे ७३ दिवस या भागात तिढा निर्माण झाला होता. डोकलामच्या मुद्यावर भूतान व चीन यांच्यात वाद आहे.

  • तोर्सा नाल्याच्या पश्चिमेकडील ‘उत्तर डोकलाम’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या भागावर चीनने कब्जा मिळवला आहे.
  • प्रत्यक्ष घटनास्थळी दोन्ही देशांचे सैन्य समोरासमोर नसले, तरी तंबू आणि निरीक्षण चौक्या अजूनही तेथे आहेत.
  • हा भूतान व चीन दरम्यानचा वादग्रस्त भाग आहे, असे जनरल रावत यांनी लष्कर दिवसाच्या पूर्वसंध्येला, १२ जानेवारीला म्हटले होते.