जम्मू-काश्मीरबाबतचे कलम ३७० हटवल्यानंतर पाकिस्तान जगात एकटा पडला असताना चीनने त्याला मदतीचा हात दिला आहे. कारण, चीनने बुधवारी जम्मू-काश्मीर मुद्द्यावर संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेची (UNSC) एक गुप्त बैठक बोलावण्याची मागणी केली. चीनची ही मागणी पाकच्या मागणीचे समर्थन मानली जात आहे. याबाबत पाकिस्तानने पोलंडसहित अनेक देशांकडे याबाबत पत्र लिहून समर्थनाची मागणी केली होती. एका बड्या राजदूताने याबाबत माहिती दिल्याचे पीटीआयच्या हवाल्याने विविध माध्यमांनी वृत्त दिले आहे.

या वृत्तांनुसार, चीनने संयुक्त राष्ट्रांकडे केलेल्या मागणीवर अद्याप कुठलाही निर्णय झालेला नाही. तसेच बैठकीचा दिवस आणि वेळही अद्याप निश्चित झालेली नाही. चीनने युएनकडे जी मागणी केली त्याचा अजेंडा ‘भारत-पाकिस्तान प्रश्न’ असा ठेवण्यात आला आहे. पाकिस्तानने यापूर्वीच जम्मू-काश्मीरचा मुद्दा जागतिक ठरवून युएनकडे यामध्ये हस्तक्षेपाची मागणी केली आहे. यासाठी पाकिस्तानने अनेक देशांकडे समर्थनाची मागणीही केली होती. मात्र, चीनशिवाय पाकिस्तानच्या या मागणीला अद्याप कुठल्याही देशाने जाहीररित्या समर्थन दिलेले नाही.

पाकिस्तानने ऑगस्ट महिन्यासाठी युएनचा अध्यक्ष देश असलेल्या पोलंडला एक पत्र लिहून युएनची बैठक बोलावण्याची मागणी केली होती. पाकिस्तानने आपले युएनमधील प्रतिनिधी मलीहा लोधी यांच्यामार्फत हे पत्र पोलंडचे राजदूत जोआना वरोनेका यांना पाठवले होते. मात्र, पोलंडने यावर अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. मात्र, आता चीनच्या हस्तक्षेपानंतर असे मानले जात आहे की, ही बैठक लवकरच बोलावली जाऊ शकते. यावेळी पाकिस्तानचे पत्र संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेतील सर्व देशांनाही दाखवले जाईल.

या पत्रात पाकिस्तानने म्हटले आहे की, भारताने उचललेली पावलं पाकिस्तान बेकायदा आणि युएन कराराच्या विरोधात असल्याचे मानतो. त्यामुळे याबाबत संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची बैठक लवकरात लवकर बोलावली जावी. गेल्या काही दिवसांत पाकिस्तानने यावर आपल्याला चीनचे समर्थन मिळाल्याचा दावाही केला होता.

गेल्या सोमवारी भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी चीनचा दौरा केला होता. यावेळी जयशंकर यांनी कलम ३७० हटवणे हा भारताचा अंतर्गत प्रश्न असल्याचे म्हटले होते. त्याचबरोबर त्यांनी हे देखील म्हटले होते की, सरकारच्या या निर्णयामुळे भारत आणि चीनच्या नियंत्रण रेषेत कुठलाही बदल केला जाणार नाही.