भारताविरोधात कारस्थान रचणं, भारताचं अंतराळ सुरक्षा तंत्र आणि मोहिम खिळखिळी करण्याच्या चीनच्या आणखी एका कटाचा पर्दाफाश झाला आहे. याबाबत एका अमेरिकन संशोधन संस्थेने दावा केला की, चीनकडून २००७ ते २०१७ दरम्यान भारतीय संवाद उपग्रहांवर सायबर हल्ल्यांचा अनेकदा प्रयत्न करण्यात आला आहे. चीनची अंतराळ मोहिम आणि इतर गोष्टींवर हा अहवाल केंद्रीत आहे.

चीन एरोस्पेस स्टडीज इन्स्टिट्यूट या अमेरिकास्थित संशोधन संस्थेच्या अहवालानुसार, भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचं (इस्त्रो) म्हणणं आहे की, आमच्या संवाद उपग्रहांवर सायबर हल्ल्यांचा कायमच धोका असतो. मात्र, आजवर या सिस्टिमवर कुठल्याही प्रकारचा धोका उद्भवलेला नाही. १४२ पानांच्या या अहवालात म्हटलंय की, सन २०१२ ते २०१८ या काळात भारतीय उपग्रहांवर चीनकडून अनेकदा सायबर हल्ले करण्यात आले आहेत. मात्र, या अहवालात केवळ एकाच सायबर हल्ल्याबाबत विस्ताराने सांगण्यात आल आहे. तो म्हणजे सन २०१२ मध्ये जेट प्रोपल्सन प्रयोगशाळेवर चिनी नेटवर्कच्या कॉम्प्युटरमधून झालेल्या हल्ल्याचा उल्लेख आहे. अहवालानुसार, या हल्ल्याने जेपीएल नेटवर्कवर पूर्ण नियंत्रण मिळवलं होतं. या हल्ल्यांमध्ये अनेक स्त्रोतांचा हवाला देण्यात आला आहे.

चीनजवळ अत्याधुनिक काउंटर स्पेस तंत्रज्ञान

भारताने आपली अंतराळ मोहिम आणि उपग्रहांना सुरक्षित ठेवण्यासाठी २७ मार्च २०१९ रोजी अॅन्टी सॅटेलाईटची (ए-सॅट) चाचणी केली होती. या चाचणीनंतर भारताकडे शत्रूच्या उपग्रहांना निष्क्रिय करण्याच्या ‘कायनेटिक किल’ या तंत्रज्ञानाचा पर्याय उपलब्ध झाला. सीएएसआयच्या अहवालानुसार, चीनजवळ मोठ्या प्रमाणावर काउंटर स्पेस तंत्रज्ञान आहे. जी शत्रूच्या स्पेस सिस्टिमला जमिनीवरुन जियोसिंक्रोनस ऑर्बिटपर्यंत निशाणा बनवू शकते.

सीमेवर भारत-चीन दरम्यान तणाव

चीनकडून भारतीय उपग्रहांना टार्गेट करण्याबाबतचा अमेरिकेचा रिपोर्ट अशा वेळी आला आहे ज्यावेळी भारत-चीन सीमेवर तणावाचे वातावरण असून दोन्ही देशांचं सैन्य एकमेकांसमोर उभं ठाकलं आहे. लडाखमधील सीमेवरील तणाव निवळावा यासाठी दोन्ही देशांदरम्यान कूटनीती आणि सैन्यस्तरावर चर्चा-बैठका होत आहेत. मात्र, अद्याप परिस्थितीत सुधारणा झालेली नाही.