पूर्व लडाख सीमेवरुन भारत-चीन संबंधात निर्माण झालेला तणाव आता हळूहळू कमी होत आहे. लडाखच्या अतिक्रमण केलेल्या काही भागांमधून चिनी सैन्याने माघार घेतली असली, तरी अजूनही हा वाद पूर्णपणे मिटलेला नाही. तणाव कमी झाला असला, तरी वाद अजून पूर्णपणे मिटलेला नाही. एकूणच या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर चीनने ब्रिक्स परिषद भारतात आयोजित करण्याच्या प्रस्तावाला पाठिंबा दिला आहे.

वेगवेगळया क्षेत्रात सहकार्य वाढवण्यासाठी भारत आणि ब्रिक्सच्या अन्य सदस्यांसह काम करण्याची इच्छा असल्याचे चीनने म्हटले आहे. पुढच्या काही महिन्यात करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती सुधारली, तर यावर्षात ब्रिक्स परिषदेच्या निमित्ताने चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग भारत दौऱ्यावर येऊ शकतात.

चीनने नेहमीच ब्रिक्स परिषदेला महत्त्व दिले आहे. या माध्यमातून सहकार्य, संबंध दृढ करण्याचा प्रयत्न राहिला आहे, असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. “भारतात होणाऱ्या ब्रिक्स परिषदेच्या आयोजनाला आमचा पाठिंबा आहे. भारत आणि अन्य देशांसोबत विविध क्षेत्रात संपर्क आणि सहकार्य बळकट करण्यासाठी काम करण्याची आमची इच्छा आहे” असे प्रवक्ते वँग वेनबिन म्हणाले. सीमेवरील परिस्थितीचा ब्रिक्स परिषदेवर परिणाम होणार का ? या प्रश्नावर त्यांनी हे उत्तर दिले.