तणावास भारतच जबाबदार असल्याचा आरोप 

मॉस्को : चिनी सैन्याने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर आक्रमकता दाखवून जैसे थे परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न केला, असे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी चीनचे संरक्षणमंत्री वे फेंग यांना शुक्रवारच्या भेटीत सुनावल्यानंतर चीनने, सीमेवरील तणावास भारतच जबाबदार असल्याचा आरोप करून आम्ही इंचभर भूमीही गमावणार नाही, अशी दर्पोक्ती शनिवारी केली.

चिनी सैनिकांच्या चिथावणीखोर वर्तनामुळे  दोन्ही देशांतील द्विपक्षीय करार आणि सीमाप्रश्नी नेमलेल्या विशेष प्रतिनिधींमधील मतैक्याचे उल्लंघन झाले आहे, असा आरोपही राजनाथ यांनी जनरल फेंग यांच्याशी चर्चा करताना केला. दोन्ही देशांनी सीमेवरील परिस्थिती जबाबदारीने हाताळण्याची आवश्यकता आहे. ती गुंतागुंतीची होऊन चिघळेल असे कोणतेही पाऊल दोन्ही देशांना उचलता येणार नाही, असे राजनाथ यांनी फेंग यांच्या निदर्शनास आणल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

मॉस्कोतील शांघाय सहकार्य परिषदेदरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये दोन तास वीस मिनिटे चर्चा झाली. त्यात सिंह यांनी परखडपणे भारताचे सर्व आक्षेप फेंग यांच्यापुढे मांडले. गेले चार महिने भारत-चीन यांच्यात सीमेवर पेचप्रसंग सुरू असताना दोन्ही देशांच्या वरिष्ठ मंत्र्यांची थेट भेट होण्याची ही पहिलीच वेळ होती. यापूर्वी परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी त्यांच्या समपदस्थांशी दूरध्वनीवर चर्चा केली होती. चीनच्या संरक्षण मंत्र्यांनीच राजनाथ सिंह यांची भेट घेण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानुसार दोन्ही नेत्यात शिष्टमंडळ पातळीवर चर्चा झाली.

प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर चीनच्या सैन्याने केलेले वर्तन आक्रमक आणि चिथावणीखोर होते. द्विपक्षीय करारांचा भंग करून जैसे थे परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न चीनच्या सैन्याने केला, असे भारताने निदर्शनास आणल्यानंतर तणावाला भारतच जबाबदार असल्याचा आरोप चीनचे संरक्षणमंत्री फेंग यांनी या भेटीत केला, अशी माहिती चीनच्या संरक्षण मंत्रालयाने शनिवारी सकाळी प्रसिद्ध केली. आम्ही आमचा एक इंचही भूभाग गमावणार नाही असा इशाराही चीनने दिल्याचे वृत्त आहे. दोन्ही देशांनी यापुढेही राजनैतिक आणि लष्करी पातळीवरील संवाद चालू ठेवावा. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील सैन्य माघारी घेऊन जैसे थे परिस्थिती पुन्हा निर्माण करावी. मतभेदांचे रूपांतर वादात होऊ देऊ नये, अशी समजही राजनाथ यांनी फेंग यांना या भेटीत दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.

दोन्ही देशांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अध्यक्ष क्षी जिनपिंग यांच्यात झालेल्या मतैक्याची अंमलबजावणी केली पाहिजे. संवाद आणि चर्चेतून प्रश्न सोडवले पाहिजेत, असे चीनने म्हटले आहे. द्विपक्षीय करारांचे काटेकोर पालन करून सीमेवरील सैन्याचे नियंत्रण करताना प्रक्षोभक वर्तन टाळले पाहिजे. तणाव वाढू देऊ नये. दोन्ही देशांनी तणाव कमी करून द्विपक्षीय संबंधांवर लक्ष केंद्रित करावे. दोन्ही देशांनी मंत्री व इतर पातळ्यांवर संवाद चालू ठेवावा, अशी पुस्तीही चीनने जोडली आहे.

मोदी आणि जिनपिंग यांच्यातील मतैक्याचा मुद्दा अधोरेखित करताना राजनाथ म्हणाले की, सीमेवर शांतता राखण्यासाठी द्विपक्षीय संबंधात सुधारणा गरजेची आहे. मतभेदांचे रूपांतर वादात होता कामा नये. संवादातून पेच सोडवावा.

चीननेही शांतता प्रस्थापित करण्याच्या मुद्दय़ावर भर दिला. ‘‘मोदी – जिनपिंग यांच्या भेटीत ज्या मुद्दय़ांवर मतैक्य झाले त्याला धरूनच मार्गक्रमण करावे.  दोन्ही देशांतील संबंध सीमा प्रश्नामुळे ताणले गेले आहेत. सध्याची परिस्थिती का निर्माण झाली हे सत्य सर्वासमोर आहे. सर्व प्रकारास भारतच जबाबदार आहे. भारताने दोन्ही देशात झालेल्या करारांचे पालन करावे’’, असे फेंग यांनी बैठकीत स्पष्ट केल्याचे चीनने म्हटले आहे.

पूर्व लडाखमधील गलवान  खोऱ्यात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर ज्या घटना गेल्या काही महिन्यांत घडल्या त्याबाबत भारताची भूमिका राजनाथ सिंह यांनी ठोसपणे मांडली. भारतीय सैन्याचे वर्तन जबाबदारीचे होते. आम्ही भारताच्या सार्वभौमत्वाचे तसेच एकात्मतेचे रक्षण करण्यास सज्ज आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

पूर्व लडाखमध्ये पँगाँग सरोवराच्या दक्षिण किनाऱ्यावर भारताने महत्त्वाच्या ठिकाणी सैन्य तैनात केले असून फिंगर २ व फिंगर ३ भागात चीनच्या घुसखोरीचा कुठलाही प्रयत्न हाणून पाडण्यास भारत सज्ज आहे. भारताने अतिरिक्त  सैन्य व शस्त्रास्त्रे संवेदनशील भागात पाठवली असून पँगाँग सरोवराच्या दक्षिण भागात भारतीय लष्कराची सज्जता लक्षणीय आहे.  १५ जून रोजी गलवान खोऱ्यात चिनी सैन्याने केलेल्या हिंसाचारात वीस भारतीय जवान हुतात्मा झाले होते, तर चीनचे ३५ सैनिक मारले गेल्याचे अमेरिकी गुप्तचर संस्थांनी म्हटले आहे. परंतु, चीनने त्याची कबुली दिलेली नाही.

तणाव निवळणे गरजेचे – चीन

भारताने सीमेवरील आपल्या सैन्याचे नियंत्रण करावे. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर चिथावणीखोर कृत्ये करू नयेत. नकारात्मक माहिती पसरवून वाद निर्माण न करता दोन्ही देशांनी प्रादेशिक शांतता आणि स्थैर्य यावर भर देण्यासाठी एकत्र प्रयत्न करावेत. सध्याची परिस्थिती निवळणे गरजेचे आहे. तसे झाले तरच शांतता प्रस्थापित होऊ शकेल, असे जनरल फेंग यांनी स्पष्ट केल्याचे चीनने म्हटले आहे.

सैन्यमाघार आवश्यक -राजनाथ

चीनने सीमेवरून सैन्य पूर्णपणे माघारी घेण्याची गरज आहे. पँगाँग सरोवर इतर भागांतील तणाव कमी करण्यासाठी ते गरजेचे आहे. चीनने जैसे थे परिस्थिती बदलण्याचे प्रयत्न करू नयेत. दोन्ही देशांनी राजनैतिक व लष्करी पातळीवर चर्चा सुरू ठेवावी. शांतता प्रस्थापित करण्यासाठी सैन्य माघारी आवश्यक आहे, असे राजनाथ यांनी जनरल फेंग यांना बजावले.