जैश-ए-महंम्मदचा म्होरक्या मसूद अझहर याला संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याच्या भारताच्या प्रयत्नांना चीनने खोडा घातला आहे. हा प्रकार पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘झुला डिप्लोमसी’चा पराभव आहे, अशा शब्दांत एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी मोदींवर सडकून टीका केली आहे.


ओवेसी म्हणाले, जेव्हा चीनने दहशतवादी मसूद अजहरला ब्लॅकलिस्ट करण्यास नकार दिला तेव्हा मोदी सरकार चीनकडून ६३० कोटी रुपयांचे बुलेटप्रुफ जॅकेटची ऑर्डर देण्यात व्यस्त होते. भारताने ही ऑर्डर केवळ चीनलाच का दिली. दुसऱ्या देशाकडून ही जॅकेट्स का घेण्यात आली नाहीत, याच उत्तर मोदींनी देशाला द्यायला हवं.

गेल्या दहा वर्षांत चीनने बुधवारी चौथ्यांदा मसूद अझहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यास नकार दिला. यासंबंधीचा प्रस्ताव अमेरिका, युके आणि फ्रान्सने संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत मांडला होता.

दरम्यान, ओवेसी यांनी भाजपावर आरोप करताना म्हटले की, केंद्र सरकारच्या मुद्रा लाभार्थ्यांची नेमकी माहिती देण्यासही सरकारने नकार दिला आहे. याद्वारे सरकार आपले अपयश झाकण्याचा प्रयत्न करीत आहे. या माहितीचा अहवाल हा सार्वजनिक व्हायलाच हवा अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.