चीनमधील मंगोलिया प्रांताच्या पश्चिमेकडील बायानूर शहरामध्ये एका व्यक्तीचा ब्यूबॉनिक प्लेगमुळे मृत्यू झाला आहे. या व्यक्तीला आधीपासूनच प्रकृतीसंदर्भातील व्याधी होत्या त्याला ब्यूबॉनिक प्लेगचा संसर्ग झाला. मल्टीपल ऑर्गन फेल्यूअरमुळे त्याचा मृत्यू झाला. या व्यक्तीला ब्यूबॉनिक प्लेग कसा झाला असावा याचा माग काढत काढत सरकारी यंत्रणांनी थेट त्याचं गाव गाठलं आणि सुरक्षेचा उपाय म्हणून संपूर्ण गाव सील करण्यात आलं आहे. मागील काही आठवड्यांमध्ये ब्यूबॉनिक प्लेगमुळे अशाप्रकारे क्वारंटाइन करण्यात आलेलं हे दुसरं गाव आहे. बिजिंगमधून हे गावही पूर्णपणे सील करण्याचे आदेश देण्यात आल्याचे युनायडेट किंग्डममधील एक्सप्रेस डॉट को डॉट युके या वेबसाईटने आपल्या वृत्तात म्हटलं आहे.

नक्की वाचा >> Black Death नावाने ओळखला जाणारा ब्यूबॉनिक प्लेगची लक्षणं काय?, संसर्ग कसा होतो?; जाणून घ्या

या संबंधित बोलताना बायानूरमधील अधिकाऱ्यांनी, “मृत व्यक्तीचे घर सील करण्यात आलं आहे. या साथीचा प्रसार होण्याची किती शक्यता आहे यासंदर्भातील तपास आम्ही करत आहोत,” अशी माहिती दिली आहे. सध्या शहरामध्ये माणसामधून माणसाला प्लेगचा संसर्ग होण्याची भिती असल्याचेही अधिकाऱ्यांनी जारी केलेल्या व्यक्तव्यामध्ये नमूद करण्यात आलं आहे. याआधी मागील आठवड्यामध्येही एका व्यक्तीचा ब्यूबॉनिक प्लेगमुळे मृत्यू झाला होता. ही घटना बायानूरच्या शेजराच्या शहरात म्हणजेच बाओटूमध्ये घडली होती.

शहरामधील आरोग्य अधिकाऱ्यांनी गावातील या दोन्ही रुग्णांचा मृत्यू श्वसनेवर परिणाम झाल्याने ब्यूबॉनिक प्लेगमुळे झाल्याचे स्पष्ट केलं आहे. अधिकाऱ्यांनी बोयानूरमध्ये मरण पावलेल्या व्यक्तीचे जुझी इन्क्यू हे गाव सील केलं आहे. या गावामध्येच या व्यक्तीला प्लेगचा संसर्ग झाल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. ब्यूबॉनिक प्लेगचा संसर्ग मोठ्या प्रमाणात होण्याचा धोका असतो आणि या साथीमध्ये मृत्यूचे प्रमाणही अधिक असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून थेट संपूर्ण गावच सील करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. ब्यूबॉनिक प्लेगवर वेळीच उपचार मिळाले नाही तर १०० पैकी ३० रुग्णांचा मृत्यू होऊ शकतो असं जागतिक आरोग्य संघटनेचं म्हणणं आहे. त्यामुळेच या रोगाचा मोठा प्रमाणात प्रादुर्भाव होऊ नये म्हणून सर्व खबरदारी घेतली जात आहे.

काय आहे ब्यूबॉनिक प्लेग

ब्यूबॉनिक प्लेगला ग्लिटीवाला प्लेग असही म्हणतात. या आजारामध्ये शरीराला असह्य वेदना होतात, खूप ताप येतो तसेच नाडीचे ठोके वाढतात. त्यानंतर शरीरावर फोड येतात आणि दोन आठवड्यांमध्ये ते पिकतात. शरीरावर फोड आल्यानंतर त्वाचेची प्रचंड जळजळ होते. प्लेग हा उंदारांमार्फत पसरणारा रोग आहे. उंदीर मेल्यानंतर त्याच्या शरीरावरील पिसवांच्या माध्यमातून प्लेगच्या विषाणूंचा संसर्ग मानवाला होतो. उंदारच्या शरीरावरील पिसवे मानवाचा चावल्याने प्लेगचा संसर्ग होतो. उंदीर मेल्यानंतर जवळजवळ दोन ते तीन आठवड्यांच्या कालावधीमध्ये प्लेगचा संसर्ग मानवाला होतो.

जागतिक आरोग्य संघटना म्हणते…

जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (डब्ल्यूएचओ) च्या मते, ब्यूबॉनिक प्लेग हा रोग साधारणपणे लहान सस्तन प्राण्यांमध्ये आणि त्यांच्या पिसूमध्ये आढळून येणा-या येरसिनिया पेस्टिस या जीवाणूमुळे होतो आणि या रोगाची लक्षणे एक ते सात दिवसांच्या कालावधीनंतर दिसून येतात. हा रोग सामान्यतः उंदीर, ससे आणि खारी सारख्या संक्रमित प्राण्यांच्या शरीरावर जगणाऱ्या पिसवांनी दंश केल्याने पसरतो.