माघारीनंतर काही दिवसांतच चीनकडून सुसज्ज मोर्चेबांधणी

भारत आणि चीन यांच्यातील डोकलामचा तिढा पाच महिन्यांपूर्वीच सुटला असला, तरी हा प्रश्न पुन्हा डोके वर काढण्याचे स्पष्ट संकेत आहेत. वादग्रस्त डोकलाम तिठय़ाचा उत्तर भाग चिनी सैन्याने पूर्णपणे ताब्यात घेतला असून, तिथे सात हेलिपॅडसह मोठय़ा प्रमाणात चिलखती वाहने असल्याचे उपग्रहांद्वारे मिळालेल्या छायाचित्रांतून दिसत असल्याचे ‘द प्रिंट’ या संकेतस्थळाने म्हटले आहे. ‘एनडीटीव्ही’ वृत्तवाहिनीनेही अशाच स्वरूपाचे वृत्त दिले आहे.

उत्तर डोकलाममध्ये चिनी सैन्य तैनात असले तरी अलीकडे तिथे सैन्याची संख्या कमी झाल्याचे भारताचे लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी काही दिवसांपूर्वीच म्हटले होते. तसेच, सामग्रीची जमवाजमव तात्पुरती असल्याचा दावाही त्यांनी केला होता. मात्र, उपग्रहांद्वारे मिळालेल्या ताज्या छायाचित्रांमुळे चिनी सैन्याचा वाढता आणि सुसज्ज वावर उघड झाला आहे. भारताने आक्षेप घेतलेली रस्तेबांधणी अल्पकाळात पूर्ण करण्याची चीनची क्षमता त्यातून दिसते, असे ‘द प्रिंट’च्या वृत्तात स्पष्ट करण्यात आले आहे.

वादग्रस्त तिठय़ाजवळ भारताच्या खंदकापासून केवळ १० मीटरवर चीनने टेहळणी मनोरा उभारला आहे. या मनोऱ्याद्वारे खोऱ्यातील कुपूप ते झुलुकपर्यंतच्या भागात टेहळणी करता येईल. यामुळे चिनी सैन्याला कुपूपपलीकडेही भारतीय लष्कराच्या हालचालींवर लक्ष ठेवणे सोपे जाणार आहे.

डोकलाम तिठय़ाचा उत्तर भागात नवे रस्ते बांधण्यात आले असून, सध्या अस्तित्वात असलेल्या रस्त्यांचे रुंदीकरण करण्यात येत आहे. डोकलामच्या वादग्रस्त भागात किमान सात नवी हेलिपॅड उभारण्यात आली आहेत. ही हेलिपॅड सुमारे २५ मीटर व्यासाची असून, त्यावर चिनी सैन्याची मोठी हेलिकॉप्टर उतरू शकतील.

उत्तर डोकलाम भागात मोठय़ा प्रमाणावर सैनिकी चौक्या उभारण्यात आल्याचेही स्पष्ट झाले आहे. सन्य आणि इतर सामग्रीच्या वाहतुकीसाठी १०० हून अधिक वाहने तैनात करण्यात आली आहेत. असे ‘द प्रिंट’ने नमूद केले आहे.

डोकलामप्रश्नी चीन आणि भूतान यांच्यात वाद सुरू आहे. या मुद्दय़ावरून भारत आणि चीन यांच्यात गेल्या वर्षी जूनपासून तणाव निर्माण झाला होता. दक्षिण डोकलाम भागात रहदारीचा मार्ग प्रशस्त करण्यासाठी चीन बांधत असलेल्या रस्त्याला भारताने आक्षेप घेतला. तब्बल ७२ दिवसांच्या तणावानंतर हा तिढा मिटला. मात्र, चीनच्या नव्या कुरापतींमुळे हा वाद पुन्हा उफाळून येण्याची चिन्हे आहेत.

कोणतीही परिस्थिती हाताळण्यास सज्ज – लष्करप्रमुख

डोकलामबाबत सध्या तरी गंभीर संकट दिसत नाही. भारत आणि चीन यांच्यातील संबंध डोकलामपूर्व पातळीवर आले आहेत, असे लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत यांनी म्हटले आहे. डोकलाम तिढय़ावेळी तैनात असलेल्या चिनी सैन्याइतके सैन्य आता तिथे तैनात नाही, असे नमूद करतानाच कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यास लष्कर सज्ज आहे, असे रावत यांनी स्पष्ट केले.