बातमीचं शीर्षक वाचून आश्चर्य वाटलं ना? अवघ्या १४ मिनिटांमध्ये चीनमधून अमेरिकेला कसं जाता येणार, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. मात्र, नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका अहवालानुसार चीन लवकरच हा अती वेगवान प्रवास शक्य करुन दाखवणार आहे. चीन अशा एका विमानाची निर्मिती करत आहे. हे विमान अणवस्त्रे घेऊन अवघ्या १४ मिनिटांमध्ये अमेरिकेच्या किनाऱ्यावर पोहचू शकेल, असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. या विमानाचा वेग २७ हजार मैल प्रती तास म्हणजेच ४३ हजार २०० किलोमीटर प्रती तास (१२ किलोमीटर प्रती सेकंद) इतका असणार आहे. म्हणजेच या हायपरसॉनिक वेगाने उड्डाण करणाऱ्या विमानाचा वेग आवाजाच्या वेगाहून ३५ पट अधिक असणार आहे.

तज्ज्ञांनी केलेल्या दाव्यानुसार २०२० पर्यंत जगातील सर्वात वेगवान हायपरसुपरसॉनिक फॅसिलटी (चीनमधील विंड टनल) ची निर्मिती पूर्ण झाल्यानंतर या विमानाची चाचणी घेण्यात येईल. आजच्या तारखेला जगातील सर्वात वेगवान विंड टन न्यूयॉर्कमधील एलईएनएक्स-एक्स ही आहे. याचा वेग २२ हजार मैल प्रती तास म्हणजेच ३६ हजार किलोमीटर प्रती तास इतका आहे.

हायपरसॉनिक विमाने बनवण्यासाठी विंड टनल्सचा उपयोग केला जातो. या टनल्समध्ये आवाजच्या वेगाहून पाचपट अधिक वेगाने वस्तू एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जातात. जर चीनचा हा प्रयोग यशस्वी झाला तर चीन अगदी काही मिनिटांमध्ये जगातील कोणत्याही देशामध्ये पोहचू शकतो. तसेच युद्धप्रसंगी काही मिनिटांमध्ये चीन जगाच्या एका कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्यात शस्त्रांची ने-आण करू शकतो.

चीनमधील या नवीन आणि गुप्त टनल प्रकल्पावर काम करणारे वरिष्ठ वैज्ञानि डॉ. झाओ वी यांनी ‘साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये या प्रकल्पाबद्दल काही खुलासे केले. २०२० पर्यंत चीनच्या या महत्वकांशी प्रकल्पाचे काम पूर्ण होईल असे झाओ यांनी सांगितले. हा टनल बनवल्याने हायपरसॉनिक हत्यारे बनवण्याचे चीनचे स्वप्न पूर्ण होणार आहे. या विमानांची चाचणी घेताना ती प्रयोगशाळेत किंवा उघड्यावर उडवता येत नाहीत त्यासाठी विंड टनल्स बांधावे लागतात. ज्यात विमानाच्या वेगाइतकी जोरात हवा वाहत असते. ज्यामुळे विमान बाहेरील हवामानात कसे उडेल, याची कल्पना येते.