News Flash

‘चीनने संपूर्ण फौजा तात्काळ मागे घ्याव्यात’

संघर्षक्षेत्रातील तणाव कमी करण्यावर दोन्ही देशांनी लक्ष केंद्रित करावे

(संग्रहित छायाचित्र)

पेंगाँग सरोवरासह संघर्षांच्या सर्व ठिकाणांवरून संपूर्ण फौजा लवकरात लवकर माघारी घेण्यासाठी चीनने आपल्यासोबत प्रामाणिकपणे काम करावे आणि पूर्व लडाखमधील तणाव निवळण्यासाठी पावले उचलावीत, असे भारताने गुरुवारी त्या देशाला सांगितले.

ज्यामुळे परिस्थिती चिघळू शकेल अशा कुठल्याही हालचाली करणे टाळून, संघर्षक्षेत्रातील तणाव कमी करण्यावर दोन्ही देशांनी लक्ष केंद्रित करावे, असे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव पत्रकार परिषदेत म्हणाले.

पेंगाँग तळ्याच्या उत्तर व दक्षिण काठावर भारतीय फौजांना धमकावण्याचे किमान तीन प्रयत्न चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने केले आहेत. यात दोन्ही बाजूंनी गोळीबारही झाला होता. फौजा माघारी घेण्याची प्रक्रिया सुरू करण्याची व सीमाभागात शांतता प्रस्थापित करण्याची जबाबदारी भारताची असल्याचे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने बुधवारी म्हटले होते. या पार्श्वभूमीवर श्रीवास्तव यांनी हे वक्तव्य केले.

भारत व चीन यांचे संरक्षणमंत्री व परराष्ट्रमंत्री यांच्यात मॉस्कोत अनुक्रमे ४ व १० सप्टेंबरला झालेल्या वेगवेगळ्या भेटींमध्ये ज्या मुद्दय़ांवर मतैक्य झाले होते, त्याचा संदर्भ श्रीवास्तव यांनी या वेळी दिला. प्रत्यक्ष ताबा रेषेवरील सर्व संघर्षस्थळांवरून फौजा तात्काळ आणि पूर्णपणे माघारी घेण्यात याव्यात असे या दोन्ही बैठकांत ठरले होते, याचा त्यांनी उल्लेख केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 18, 2020 12:28 am

Web Title: china calls for immediate withdrawal of troops abn 97
Next Stories
1 चीनच्या ५ नागरिकांवर अमेरिकेकडून ‘हॅकिंग’चा आरोप
2 सोने तस्करीप्रकरणी केरळच्या उच्च शिक्षणमंत्र्यांची चौकशी
3 ‘इनहेलर’च्या माध्यमातून लस देण्याचा पर्याय
Just Now!
X