गेल्या काही महिन्यांपासून भारत आणि चीन या देशांदरम्यान तणावाचं वातावरण आहे. गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षानंतर दोन्ही देशांतील तणाव मोठ्या प्रमाणात वाढला होता. त्यानंतर वरिष्ठ पातळीवरील चर्चाही पार पडल्या. मात्र चीनच्या कुरापती अद्यापही कमी होत नाहीत. चीनकडून घुसखोरीचे प्रयत्न सुरू अद्यापही सुरू आहेत. परंतु भारतीय लष्करानं त्यांचे मनसुबे उधळून लावले. दोन्ही देशांमधील तणाव वाढला असतानाच लडाखमधील जवळपास १ हजार चौरस किलोमीटर भूभाग चीनच्या नियत्रणाखाली गेल्याचं वृत्त ‘द हिंदू’ या इंग्रजी वृत्तपत्रानं दिलं आहे.

लडाखमधील नियंत्रण रेषेजवळील १ हजार चौरस किलोमीटर भूभागावर चीनचं नियंत्रण आहे. गुप्तचर विभागानं दिलेल्या माहितीवरून यासंदर्भातील माहिती मिळाली असल्याचं एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं सांगितल्यानं ‘दं. हिंदूनं’ वृत्तात म्हटलं आहे. डेपसांगपासून चौशुलपर्यंत चीननं आपली लष्करी ताकद वाढवली आहे. तसंच पेट्रोलिंग पॉईंट १०-१३ ते देपसांग प्लेन्समधील ९०० चौरस किलोमीटरचा भाग चीनच्या नियंत्रणाखाली आहे. तर गलवान खोऱ्यातील २० चौरस किलोमीटर, हॉटस्प्रिंगमधील १२ चौरस किलोमीटर, पँगाँग त्सो परिसरातील ६५ चौरस किलोमीटर तर चौशुलमधील २० चौरस किलोमीटर भाग चीनच्या ताब्यात असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिल्याचं ‘द हिंदू’नं म्हटलं आहे. यापूर्वी गलवान खोऱ्यातही भारत आणि चीनच्या जवानांमध्ये चकमक झाली होती. त्यामध्ये भारताच्या २० जवानांना हौतात्म्य आलं होतं. तर भारतानंही प्रत्युत्तर देत चीनच्या अनेक सैनिकांना ठार केलं होतं.

एकीकडे तणाव निवळण्यासाठी भारतासोबत चर्चा करत असलेल्या चीननं सीमेवरील आपल्या कुरापती सुरूच ठेवल्या आहेत. २९-३० ऑगस्टच्या रात्री भारत आणि चीन या दोन्ही देशाचे सैनिक आमने-सामने आल्याची माहिती समोर आली होती. यावेळी भारतीय हद्दीत घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या चिनी सैन्याला भारतीय सैनिकांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं होतं. भारतीय लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, चीनच्या सैनिकांनी आधी ठरलेल्या एकमताचं उल्लंघन केलं आणि पूर्व लडाखमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. पँगोंग लेक परिसरात दोन्ही देशाचे सैनिक २९-३० ऑगस्टच्या रात्री आमने-सामने आले होते. पण भारतीय लष्कराने प्रतिकार करत पँगोंग आणि Tso Lake परिसरात चीनच्या सैनिकांना घुसखोरीपासून रोखलं.