News Flash

…म्हणून चीननेच सायबर हल्ला करुन मुंबईची बत्तीगुल केली; अमेरिकन कंपनीचा खळबळजनक दावा

भारतातील एक डझनही अधिक ठिकाणी चीन हॅकर्सने घुसखोरी केल्याचं उघड

मुंबईमध्ये मागील वर्षी १२ ऑक्टोबर रोजी वीज पुरवठा खंडित होण्यामागे चीनचा हात असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. अनेक दशकांमधील सर्वात मोठा विजपुरवठा खंडित होण्याचा प्रकार म्हणून ज्या घटनेकडे पाहिजे जाते त्या घटनेची थेट संबंध भारत आणि चीनदरम्यान गलवानच्या खोऱ्यात सुरु असणाऱ्या संघर्षाशी असल्याचे सांगण्यात येत आहे. भारताच्या अर्थिक राजधानीला ठप्प करणारा हा प्रकार चीनमधून झालेल्या सायबर हल्ल्यामुळे असल्याचे सांगण्यात येत आहे. भारताने चीनसोबत सीमेवर अधिक संघर्ष करु नये असा संदेश देण्यासाठी हा हल्ला घडवून आणल्याचे सांगितले जात आहे.

अमेरिकेतील द न्यू यॉर्क टाइम्समधील वृत्तानुसार भारत आणि चीनच्या सैन्यामध्ये सीमेजवळ जोरदार संघर्ष सुरु असतानाच चीनने हा सायबर हल्ला केला. भारतामधील वीजपुरवठा सुरळीत चालवण्यासाठी ज्या सॉफ्टवेअर आणि सिस्टीमचा वापर केला जातो त्यामध्ये चीनमधील हॅकर्सने याच भारत चीन संघर्षाच्या काळात मालवेअर इंजेक्ट केला. विशेष म्हणजे द न्यू यॉर्क टाइम्सने हा दावा आता केला असला तरी यापूर्वीही चिनी हॅकर्सचा मुंबईला काळोखात लोटण्यात हात होता अशी शक्यता व्यक्त करण्यात आलीय.

नोव्हेंबर महिन्यामध्ये इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तामध्ये महाराष्ट्र पोलिसांच्या साबयर विभागाने मुंबईतील वीजपुरवठा खंडित होण्यामागे मालवेअरच्या माध्यमातून केलेल्या सायबर हल्ल्याची शक्यता व्यक्त केली होती. ठाणे जिल्ह्यातील पडघा येथे लोड डिस्पॅच सेंटरमधील ट्रीपिंगमुळे हा वीजपुरवठा खंडित होण्याचा प्रकार घडल्याचा दावा करण्यात आला होता. १२ ऑक्टोबर रोजी वीजपुरवठा खंडित झाल्याने मुंबईतील अनेक भागांमध्ये अनेक तास वीज नव्हती. सकाळी दहा वाजल्यापासून पुढील अनेक तास अनेक ठिकाणी वीजपुरठवा सुरळीत झाला नव्हता. काही ठिकाणी तर बारा तास उलटल्यानंतरही वीज नव्हती. हा वीजपुरवठा खंडित झाल्याने रेल्वेच्या लोकसेवेपासून इतर अनेक सेवांना मोठा फटका बसला होता.

द न्यू यॉर्क टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार वीज पुरवठा करणाऱ्या यंत्रणेवर हल्ला करणाऱ्या मालवेअरचा शोध रेकॉर्डेड फ्युचर या २००९ मध्ये स्थापन झालेल्या सायबर सिक्युरिटी कंपनीने घेतला आहे. या सायबर हल्ल्यातील अनेक मालवेअर अ‍ॅक्टीव्ह करण्यात आले नव्हते. म्हणजेच नियोजित हल्ल्याच्या काही टक्के हल्लाच यशस्वी होऊनही मुंबईत एवढ्या मोठ्या प्रमाणात गोंधळ उडवणारा प्रकार घडला. मात्र या मालवेअर ट्रेसिंगमध्ये कोड रिस्ट्रीक्शन असल्याने यासंदर्भातील संपूर्ण माहिती काढण्यात कंपनीला अपयश आल्याचेही विृत्तात म्हटलं आहे. या कंपनीने भारतीय अधिकाऱ्यांना यासंदर्भात माहिती दिल्याचे वृत्तात म्हटलं आहे.

चिनी सरकार पुरस्कृत रेडइको नावाच्या कंपनीने केलेल्या सायबर हल्ल्यामुळे मुंबई काळोखात गेल्याचे सांगण्यात येत आहे. रेकॉर्डेड फ्युचरचे कार्यकारी अधिकारी असणाऱ्या स्टुअर्ट सोलेमॉन यांनी दिलेल्या माहितीनुसार, रेडइको कंपनीने अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने भारतामध्ये वीजपुरवठा करणाऱ्या यंत्रणेमधील एक डझनहून अधिक ठिकाणी घुसखोरी केली.

रेकॉर्डेड फ्युचरने प्रकाशित केलेल्या ब्लॉगमध्ये कंपनीने या सायबर हल्ल्यातील नोंदींचाही उल्लेख केलाय. “२०२० च्या सुरुवातीपासून रेकॉर्डेड फ्युचरच्या इनस्कीट ग्रुपला भारतीय संस्थांशीसंबंधित यंत्रणांमध्ये चिनी सरकारचा पाठिंबा असणाऱ्या कंपन्यांकडून घुसखोरी होत असल्याचे संकेत मिळत होते. २०२० च्या मध्यामध्ये कंपनीला भारतातील वीजपुरवठा करणाऱ्या यंत्रणांवर हल्ला करणारे काही मालवेअर सापडले. वीजपुरठ्यातील दाब आणि मागणीवर नियंत्रण मिळवणाऱ्या यंत्रणांवर हल्ला करुन १० ठिकाणचे कंट्रोल मिळवण्याचा प्रयत्न करण्यात आला. याशिवाय भारतामधील दोन बंदरांच्या यंत्रणांवरही हल्ला करण्यात आल्याचे दिसून आलं,” असं या ब्लॉगमध्ये म्हटलं आहे. भविष्यातही आम्ही रेडइकोच्या हलचालींवर लक्ष ठेवणार असल्याचं रेकॉर्डेड फ्युचरने म्हटलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 1, 2021 2:30 pm

Web Title: china cyberattack on india could have led to mumbai power outage last year says nyt report scsg 91
Next Stories
1 “तिच्याशी लग्न करणार का?,” शाळकरी मुलीवरील बलात्कार प्रकरणातील आरोपीला सुप्रीम कोर्टाचा सवाल
2 घरगुती गॅसच्या दर वाढीवरून राहुल गांधींचा मोदी सरकारवर निशाणा, म्हणाले…
3 “पंतप्रधान मोदींनी करोनाची लस घेतल्याने…”; फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया
Just Now!
X