पूर्व लडाखमध्ये घुसखोरी केलेल्या भागातून चिनी सैन्याने पूर्णपणे माघार घ्यावी, यासाठी काल मोल्डोमध्ये भारतीय आणि चिनी सैन्य अधिकाऱ्यांमध्ये कमांडर स्तरची पाचव्या फेरीची बैठक झाली. त्याचवेळी काशगर एअर बेसवर पीपल्स लिबरेशन आर्मीच्या एअर फोर्सने H-6 बॉम्बर विमाने तैनात केल्याचे उपग्रह फोटोंवरुन समोर आले आहे.
पूर्व लडाखमधील पँगाँग लेकपासून काशगर एअर बेस ६९० किलोमीटर अंतरावर आहे. या पँगाँग टीएसओ क्षेत्रातून चिनी सैन्य अजूनही पूर्णपणे मागे हटलेलं नाही. त्यामुळे तणावाची स्थिती कायम आहे. काशगर एअर बेसवर सहा शियान H-6 बॉम्बर विमाने चीनने तैनात केली आहेत. दोन विमानांमध्ये पेलोड म्हणजे शस्त्रसज्ज आहेत. फास्ट मेल न्यूजने हे वृत्त दिले आहे.
H-6 बॉम्बर विमानाचे वैशिष्टय म्हणजे ही विमाने अण्वस्त्र हल्ला करण्यास सक्षम आहेत. लडाखपासून ६०० किमी अंतरावर हा विमानतळ आहे. सहा हजार किलोमीटर हा H-6 विमानांचा पल्ला आहे. त्याशिवाय १२ शियान JH-7 फायटर बॉम्बर आणि चार J11 / 16 फायटर विमाने तैनात केली आहेत. अलीकडेच दक्षिण चीन समुद्रात चीनच्या H-6J आणि H-6G विमानांनी युद्धसराव केला. H-6J विमाने YJ-12 जहाजविरोधी क्रूझ मिसाइल वाहून नेण्यास सक्षम आहे.
आता लडाखबाहेर उत्तराखंडच्या लिपूलेख पासजवळ चीनने तैनात केली बटालियन
उत्तराखंडच्या लिपूलेख पासजवळ चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने आता बटालियनची तैनाती केली आहे. लडाख क्षेत्राबाहेर झालेली ही पहिली तैनाती आहे. मागच्या काही आठवड्यांपासून या भागात चिनी सैन्याच्या हालचाली दिसत होत्या. या घडामोडींशी संबंधित असलेल्या सूत्रांनी हिंदुस्थान टाइम्सला हे वृत्त दिले आहे.
“लिपूलेख पास, उत्तर सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेश या नियंत्रण रेषेजवळील भागांमध्ये चिनी सैनिकांची संख्या वाढली आहे” असे वरिष्ठ लष्करी कमांडर्सनी सांगितले. लिपूलेख पास मानसरोवर यात्रेच्या मार्गामध्ये आहे. भारताने लिपूलेख पासपर्यंत ८० किमीचा रस्ता बांधला. तेव्हापासून हा मार्ग चर्चेत आहे. कारण नेपाळने यावर आक्षेप घेतला. नेपाळने आपल्या नकाशात बदल केला आहे. कालापानी, लिपूलेख, लिंपियाधुरा हे भारतीय भूभाग नकाशात आपल्या हद्दीत दाखवले आहेत. नेपाळमधील ओली सरकारच्या या निर्णयामुळे भारत-नेपाळ संबंध खराब झाले आहेत.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on August 3, 2020 9:43 am