चीन आणि ऑस्ट्रेलियामधील संबंध कमालीचे ताणले गेलेले असतानाच आता चीनने एका ऑस्ट्रेलियन महिलेला अटक केली आहे. चीनच्या सरकारी वृत्तवाहिनीसाठी काम करणाऱ्या वृत्तनिवेदिका चेंग लेई यांना अटक करण्यात आली आहे. चीनने लेई यांना का अटक करण्यात आली आहे याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. मात्र प्राथमिक अंदाजानुसार हेरगिरीच्या गुन्ह्याखाली चीनने लेई यांच्यावर कारवाई केली आहे. लेई या मूळच्या ऑस्ट्रेलियाच्या असून त्या सीजीटीएन या सरकारी वृत्तवाहिनीच्या इंग्रजी अवृत्तीसाठी काम करतात. चीनच्या या निर्णयाचा ऑस्ट्रेलियाने कठोर शब्दात निषेध नोंदवला आहे. यासंदर्भातील वृत्त ‘द टेलिग्राफ’ने दिलं आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार १४ ऑगस्ट रोजी लेई यांची सरकारी अधिकाऱ्यांकडून चौकशी केली जात होती. ३१ ऑगस्ट रोजी लेई यांना अधिकृतपणे अटक करण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियाचे परराष्ट्र मंत्री मैरिसे पायने यांनी दिलेल्या माहितीनुसार चीनमधील ऑस्ट्रेलियन अधिकाऱ्यांनी मागील गुरुवारी लेई यांच्याशी व्हिडिओच्या माध्यमातून संपर्क साधला. ऑस्ट्रेलियन सरकार लेई आणि त्यांच्या कुटुंबियांना आवश्यक ती सर्व मदत करत असल्याचे पायने यांनी स्पष्ट केलं. चिनी अधिकाऱ्यांनी लेई यांच्याकडे चौकशी केली जात असल्याची माहिती १४ ऑगस्ट रोजीच दिली होती. मात्र याबद्दल सोमवारी पहिल्यांदाच सार्वजनिकपणे घोषणा करण्यात आली.

लेई यांना का ताब्यात घेण्यात आलं आहे याबद्दलची माहिती देण्यास चीनने नकार दिल्याचे ऑस्ट्रेलियाने म्हटलं आहे. टेलीग्राफने दिलेल्या वृत्तानुसार हेरगिरीच्या एका प्रकरणाशी लेई यांचा संबंध असल्याचे सांगण्यात येत आहे. लेई यांना अटक करण्याच्या काही दिवस आधीच चीन सरकारच्या एका माजी कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली आहे. यांग हेंगजुन अस या कर्मचाऱ्याचं नाव असून त्याला बीजिंगमधून अटक करण्यात आली. हेंगजुनने हेरगिरी केल्याचा आरोप चीनने मार्च माहिन्यात लावला होता. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने चीनला यावरुन चांगलेच सुनावले होते. लेई यांनी २०१३ साली ऑस्ट्रेलियाचे नागरिकत्व स्वीकारले आहे. या प्रकरणामुळे दोन्ही देशांमध्ये अधिक कटुता निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.