अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा चीनवर हल्लाबोल केला आहे. ‘करोना व्हायरसच्या विषयात एकतर चीनकडून भयंकर चूक झाली आहे किंवा ते असमर्थ आहेत’ अशा शब्दात डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवर टीका केली. ‘करोना व्हायरसला रोखता आलं असतं, ते सोप होतं पण काहीतरी घडलयं’ असं ट्रम्प व्हाइट हाऊसच्या ओव्हल ऑफिसमध्ये पत्रकारांशी बोलताना म्हणाले. इंडिया टुडेने हे वृत्त दिले आहे.

“या घटनेला दोनबाजू आहेत. एकतर त्यांनी गंभीर चूक केली असावी किंवा ते असमर्थ आहेत. कोणी तरी मूर्खपणा केला, त्यांनी त्यांचे काम व्यवस्थित केले नाही. हे खूप वाईट आहे” असे ट्रम्प एका प्रश्नाच्या उत्तरात म्हणाले.

जगभरात ३७ लाख लोकांना करोना व्हायरसची बाधा झाली आहे. या व्हायरसमुळे आतापर्यंत २ लाख ६४ हजार नागरिकांचा मृत्यू झाला आहे. एकटया अमेरिकेत ७५ हजारपेक्षा जास्त मृत्यू झाले आहेत. १२ लाख लोकांना लागण झाली आहे. १८० पेक्षा जास्त देशांमध्ये हा धोकादायक व्हायरस पसरल्याचे ट्रम्प यांनी सांगितले.