जैश-ए -मोहम्मदचा प्रमुख व पठाणकोट हल्ल्याचा सूत्रधार मसूद अझर याला चीनने पुन्हा एकदा अभय दिले आहे. पठाणकोट हवाई तळावरील हल्ल्यानंतर  मसूद अझरला दहशतवादी घोषित करण्यासाठी भारताने संयुक्त राष्ट्रामध्ये ठराव मांडला होता. मात्र चीनने अझरला काळ्या यादीत टाकण्याच्या प्रस्तावावर नकाराधिकाराचा वापर करुन त्यालाअभय दिले होते. आंतरराष्ट्रीय पातळीवर दहशतवादाविरोधात एकजूट करण्याच्या तत्त्वाला चीनने या निर्णयाद्वारे हरताळ फासले.

या ठरावाची मुदत सोमवारी संपणार होती. त्यामुळे संयुक्त राष्ट्रसंघ यावेळी तरी मसूद अझरला दहशतवादी घोषीत करेल, अशी भारताला आस होती. मात्र चीनने हा प्रस्ताव रोखून धरण्याची मुदत पन्हा वाढवत मसूदचा बचाव केला आहे. चीनने ठरावाची मुदत तब्बल सहा महिन्यांनी वाढवली आहे.  चीनचे संयुक्त राष्ट्रातील प्रतिनिधी लिउ लेयी यांनी या प्रस्तावर अजूनही मतभेद असल्याचे म्हटले आहे.

विशेष म्हणजे १५ देशांपैकी १४ देशांनी भारताच्या प्रस्तावाला समर्थन दिले होते. चीन एकमात्र भारताच्या प्रस्तावाला विरोध केला होता. जैश- ए- मोहम्मद या पाकिस्तानी संघटनेला संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषद समितीने २००१ मध्ये काळ्या यादीत टाकले आहे. त्यामुळे मसूद अझरवर निर्बंध लादण्यास काहीच हरकत येणार नाही, अशी भारताची भूमिका होती. मात्र चीनमुळे महसूद अझरला दहशतवादी ठरविण्याचे भारताचे प्रयत्न अयशस्वी होत आहेत.