एक हजार वर्षातील सर्वाधिक पाऊस
चीनमध्ये हेनान प्रांतात आलेल्या पुरात गेल्या एक हजार वर्षातील सर्वात मोठा पाऊस झाला असून १३ जण ठार झाले, तर एक लाख लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले असल्याचे बुधवारी सांगण्यात आले.

उपमार्गांच्या ठिकाणी अडकून पडलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी लष्कर तैनात करण्यात आले आहे. सार्वजनिक ठिकाणीही लोक अडकून पडले असून धरण फुटल्याचे सांगण्यात येत असून त्यामुळे सतर्कता पाळण्यात येत आहे. हवामानतज्ज्ञांच्या मते एक हजार वर्षात तरी असा पाऊस झालेला नाही. झेंगझाऊ या १.२६ कोटी लोकसंख्येच्या शहरात उपमार्गातील बोगदे पाण्याने भरले असून सार्वजनिक ठिकाणेही पाण्याखाली गेली आहेत. अध्यक्ष क्षी जिनपिंग यांनी पीपल्स लिबरेशन आर्मीचे जवान तैनात केले असून सर्व पातळीवरील अधिकाऱ्यांना लोकांच्या सुरक्षेची काळजी घेण्यास सांगितले आहे.

झेंगझाऊ शहरात असा पूर कधी आला नव्हता, पीपल्स लिबरेशन आर्मीच्या सेंट्रल थिएटर कमांडने हेनान येथे सैन्य पाठवले असून तेथे धरण जवळपास फुटण्याच्या मार्गावर आहे. पावसाने धरणाची क्षमता संपली आहे. पीपल्स लिबरेशन आर्मीने म्हटले आहे, की सिनो वेबो या समाजमाध्यम खात्यावर या पुराची दृश्ये टाकण्यात आली आहेत. यिचुआन या हेनान प्रांतातील परगण्यात असलेल्या धरणात २० मीटर  बंधाऱ्याला तडा गेला आहे. अनेक लोक उपनगरी गाड्यात अडकले असून काही जण गजांना धरून जीव वाचवण्याच्या प्रयत्नात आहेत, तर काहींच्या गळ्यापर्यंत पाणी आले आहे. अनेक मोटारी व वाहने पुरात वाहून गेली असून लाइन फाइव्ह येथे उपमार्गाच्या बोगद्यात पाणी शिरून अनेक लोक अडकून पडले आहेत.