गेल्या काही महिन्यांपासून भारत चीन सीमेवर तणावाचं वातावरण आहे. एकीकडे भारताकडून चर्चेच्या मार्गानं प्रश्न सोडवण्याचे प्रयत्न होत आहेत, तर दुसरीकडे चीनच्या कुरापती मात्र सुरूच आहेत. परंतु यामागे काही वेगळंच कारण असल्याचं म्हटलं आहे. चीनमधील भूकबळी लपवून त्या प्रश्वावरून लक्ष विचलित करण्यासाठी चीन अशाप्रकारच्या कुरापती करत असल्याचं सांगण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी क्लिन युअर प्लेट या मोहिमेची सुरूवात केली होती. अन्नधान्याची टंचाई भासत असलेल्या चीननं आता अशाप्रकारे कुरापती सुरू केल्या आहेत. एवढंच नाही तर दक्षिण चीन महासागरातही एप्रिल ते ऑगस्टदरम्यान चीननं कमीतकमी पाच वेळा लाइव्ह फायर ड्रिलही केलं आहे. गरीबी आणि भूकबळीवरून जनतेचं लक्ष विचलित होऊन ते देशभक्ती आणि राष्ट्रावादावर केंद्रीत व्हावं याचे कम्युनिस्ट पक्षाकडून प्रयत्न सुरू आहेत.

चीनकडून असे प्रकार पहिल्यांदाच होत नाहीयेत. गरीबी आणि भूकबळी लपवण्यासाठी यापूर्वीबी चीननं सीमावाद निर्माण केला होता. १९६२ मध्ये चीनमध्ये दुष्काळ आला होता. त्यावेळी चीनचे सर्वोच्च नेते माओत्से तुंग यांनी भारतासोबत युद्ध केलं होतं. त्यावेळीही चीनमध्ये हजारो लोकांचा भूकबळी गेला होता. याविरोधात ग्रेट लीप फॉरवर्ड मुव्हमेंटही सुरू करण्यात आली होती. अगदी तसाच प्रकार आता चीनचे राजकारणी आणि पीपल्स लिबरेशन आर्मी करत आहे.

करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर चीनमध्ये अन्नधान्याचं संकट गडद होत चाललं आहे. ग्लोबल टाइम्सनं दिलेल्या वृत्तानुसार राष्ट्राध्यक्ष शी. जिनपिंग यांनी २०१३ च्या क्लिन युअर प्लेट या मोहिमेला पुन्हा सुरूवात केली आहे. या योजनेद्वारे देशात असलेली अन्नधान्याची टंचाई लपवण्याचा चीन प्रयत्न करत असल्याचं पश्चिमी माध्यमांचं म्हणणं आहे. चीनच्या सामान्य प्रशासन विभागाच्या आकडेवारीनुसार गेल्या वर्षीच्या तुलनेत जानेवारी ते जुलैदरम्यान चीनमध्ये धान्याची आयात २२.७ टक्के म्हणजे ७४.५१ दशलक्ष टन इतकी वाढली आहे. तर दुसरीकडे दरवर्षी गव्हाच्या आयातीतही १९७ टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे. गेल्या वर्षी जुलै महिन्यात चीनमध्ये मक्याची आयातही अपेक्षेपेक्षा २३ टक्क्यांनी वाढली होती. जर देशात मुबलक प्रमाणात अन्नधान्य उपलब्ध आहे तर मोठ्या प्रमाणात चीन आयात का करतो ? हा प्रश्न यानिमित्तानं उपस्थित केला जात आहे.