लडाखमध्ये सैनिकांमध्ये झालेल्या चकमकीवरुन भारत आणि चीनमध्ये असलेला तणाव कमी होण्यासाठी प्रयत्न सुरु असताना महत्त्वाची माहिती समोर आली आहे. युएस न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, भारताला धडा शिकवण्यासाठी चिनी सैन्यांकडून हा हल्ला करण्यात आला. अमेरिकन गुप्तचर यंत्रणेकडून हा खुलासा करण्यात आला आहे. चीनच्या वरिष्ठ अधिकऱ्याने भारतीय जवानांवर हल्ला करण्यासाठी आपल्या जवानांना आदेश दिला होता अशी माहिती गुप्तचर विभागाकडून देण्यात आली आहे. अमेरिकेच्या रिपोर्टमध्ये सुत्रांच्या हवाल्याने देण्यात आलेल्या माहितीनुसार, चीनच्या पश्चिम थिएटर कमांडचे प्रमुख जनरल झाओ जोंगकी यांनी गलवान खोऱ्यात हल्ल्यासाठी परवानगी दिली होती.

झाओ यांना भारताला धडा शिकवायचा होता
झाओ यांनी याआधीही भारतासोबत झालेल्या वादांवर लक्ष ठेवलं आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, झाओ यांना हल्ला करुन भारताला धडा शिकवायचा होता. अमेरिकेच्या रिपोर्टमुळे गेल्या काही दिवसांपासून चीन करत असलेले दावे फोल ठरत आहेत. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय जवानांनी चिनी सैनिकांवर हल्ला केल्याचा दावा केला होता. जनरल झाओ काही मोजक्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपैकी एक आहेत जे अद्यापही पिपल्स लिबरेशन आर्मीमध्ये कर्तव्य बजावत आहेत. झाओ यांनी याआधी चीनला चेतावणी देताना भारत, अमेरिका आणि त्यांच्या सहकाऱ्यांपासून शोषण होऊ नये याकरिता चीनने दुबळं दिसता कामा नये असं म्हटलं होतं.

चीन या हल्ल्यातून भारताला आपण किती सक्षम आहोत हा संदेश देण्याचा प्रयत्न करत असल्याचं अमेरिकेच्या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. पण भारतीय जवानांवर हल्ला करण्याची मोठी किंमत चीनलाही मोजावी लागली असून त्यांचेही सैनिक ठार झाले आहेत. चर्चेदरम्यान भारतावर दबाब ठेवण्यासाठीच चीनकडून ही खेळी केली जात असल्याचं बोललं जात आहे. पण चीनची खेळी त्यांच्यावरच पलटली. चकमकीनंतर भारतात चीनविरोधात रोष असून त्यांच्या वस्तूंवर बहिष्कार टाकण्यासाठी आंदोलन सुरु झालं आहे. अनेकांनी मोबाइलमधून टिकचटॉक अॅप डिलीट केलं आहे. सोबतच अमेरिका आणि भारतातील संबंध अजून चांगले झाले आहेत. त्यामुळे चीनची चिंता वाढली आहे.