संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेचे माजी अध्यक्ष जॉन अ‍ॅश यांना चीनने लाच दिली होती त्यामुळे त्यांना अटक झाली आहे. त्यामुळे संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा मंडळातील सुधारणा कार्यक्रम रोखण्यासाठी चीन संयुक्त राष्ट्रातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना लाच देत होता हे आता पुरते स्पष्ट झाले आहे.
अँटिग्वा व बारबुडा येथील माजी राजदूत असलेल्या अ‍ॅश यांच्यावर गेल्या महिन्यात चिनी उद्योगपती व अधिकाऱ्यांकडून १३ लाख डॉलर्सची लाच मिळाली होती, असा आरोप अमेरिकचे अभियोक्ते प्रीत भरारा यांनी त्यांच्यावर ठेवला आहे. अ‍ॅश यांनी मकाव या राजधानीच्या शहरातील साऊथ नावाच्या संयुक्त राष्ट्र पुरस्कृत केंद्रात ही लाच स्वीकारली होती. चीनने संयुक्त राष्ट्रात सुधारणा होऊ नयेत यात अनेक पद्धतीने अडथळे आणले असून चक्क तेथील अधिकाऱ्यांना लाचही दिली आहे. अँटिग्वा येथे व्यापारी फायद्यासाठीही चीनने अ‍ॅश यांना लाच दिली होती, असे समजते.
चीनचे हित जपण्यासाठी आमसभेच्या माजी अध्यक्षांनी वेळोवेळी भ्रष्टाचाराच्या मार्गाचा अवलंब केला असे भारताचे आधीपासून म्हणणे होते व ते आता खरे ठरले आहे. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा मंडळातील सुधारणा कार्यक्रमास चीनने नेहमीच विरोध केला होता. अ‍ॅश यांनी संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेचे अध्यक्ष असताना २०१३-१४ मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या सुधारणांवर एक मसुदा तयार केला होता पण त्यांची अगदी गुळमुळीत व कुठल्याही ठोस प्रस्तावांचा समावेश नसलेली आवृत्ती सप्टेंबर २०१५ मध्ये मान्य करण्यात आली होती. त्यानंतरही हा मसुदा पुढे नेण्यात अ‍ॅश यांनी अनेक अडथळे आणले त्यामुळे संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा मंडळात भारताच्या आशा धुळीस मिळाल्या होत्या. अमेरिकेतील मॅनहटनचे अभियोक्ते प्रीत भरार यांनी अ‍ॅश व त्यांच्या काही सहकाऱ्यांच्या अटकेची घोषणा केली होती. अ‍ॅश यांनी संयुक्त राष्ट्रे व अँटिग्वात चीनचे हित जपण्यासाठी एका चिनी व्यापाऱ्याकडून आठ लाख डॉलर्सची लाच घेतली होती. संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस बान की मून यांना या आरोपांच्या प्रकरणामुळे धक्का बसला असून संयुक्त राष्ट्रात भ्रष्टाचार नाही असेच वाटत होते. पण आता ते खोटे सिद्ध झाले आहे, असे त्यांचे प्रवक्ते स्टीफनी डय़ुजारिक यांनी सांगितले.