भारत आणि चीनमध्ये सुरु असलेला तणाव अद्यापही पूर्णपणे कमी झालेला नाही. दरम्यान अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माइक पॉम्पिओ यांनी चीन क्वाड देशांसाठी (अमेरिका, भारत, ऑस्ट्रेलिया, जपान) धोका असल्याचं म्हटलं आहे. यावेळी त्यांनी चीनने लडाख सीमेवर ६० हजार सैन्य तैनात केलं असल्याचा दावा केला असून चीनविरोधातील लढाईत भारताला अमेरिकेच्या मदतीची गरज असल्याचं म्हटलं आहे.

पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, क्वाड देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची मंगळवारी टोकियोमध्ये बैठक पार पडली. करोनानंतर पहिल्यांदाच समोरासमोर पार पडलेल्या या बैठकीत अनेक मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. बैठकीतून परतल्यानंतर माइक पोम्पिओ यांनी तीन मुलाखती दिल्या. या मुलाखतींमध्ये त्यांनी चीनकडून असणारे धोके तसंच नियमांचं उल्लंघन यावर भाष्य केलं.

“भारत, ऑस्ट्रेलिया, जपान यांच्या परराष्ट्र मंत्र्यांसोबत मी होतो…चार सर्वात मोठ्या लोकशाही, चार शक्तिशाली अर्थव्यवस्था, चार देश…प्रत्येक देशाला चिनी कम्युनिस्ट पार्टीकडून धोका आहे. याचा जाणीव त्यांना आपल्या देशातही होत आहे,” असं माइक पोम्पिओ यांनी The Guy Benson कार्यक्रमात सांगितलं.

पुढे ते म्हणाले की, “प्रत्येकाला याची जाणीव आहे. मग ते भारतीय असोत ज्यांना हिमालयात सैन्यासोबत लढा द्यावा लागत आहे. चीनने लडाखमध्ये आता मोठ्या प्रमाणात सैन्य तैनात करण्यास सुरुवात केली आहे”. चीनला रोखण्यासाठी क्वाड देश धोरण आखत असल्याची माहिती माइक पोम्पिओ यांनी दिली आहे. तसंच भारताला चीनविरोधात लढा देताना नक्कीच अमेरिकेची साथ मिळणं गरजेचं असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं आहे.