News Flash

भारत-चीन वाद : ‘अरुणाचल प्रदेशला आम्ही कधी मान्यताच दिली नाही, तो तर दक्षिण तिबेटचा भाग’; चीनचा दावा

"अरुणाचल प्रदेशला आम्हीच कधीच मान्यता दिलेली नाही"

फाइल फोटो (Xi Jinping and Modi Photo by Nikkei Montage/AP/Reuters)

भारत आणि चीनदरम्यान सुरु असणाऱ्या सीमावादात चीनकडून आक्रामक भूमिका घेतली जात आहे. अरुणाचल प्रदेशमध्ये सीमा भागातून चीनच्या सेनेने पाच भारतीयांचे अपहरण प्रकरणामध्ये प्रतिक्रिया देताना चीनने आम्ही अरुणाचल प्रदेश भारताचा भाग असल्याचे मानत नाही असं म्हटलं आहे. आम्ही कायमच अरुणाचलला चीनच्या दक्षिणेकडील तिबेटचा भाग मानत आलो आहोत असंही चीनने स्पष्ट केलं आहे. भारतीय सैनिकांनी एलएसीचे (प्रत्यक्ष नियंत्रण रेषा) उल्लंघन करुन बेकायदेशीरपणे चीनच्या सीमेत प्रवेश केला आणि तेथे तैनात असणाऱ्या सैनिकांना इशारा देण्यासाठी गोळीबार (वार्निंग शॉट्स फायर) केल्याचा आरोप चीनने केला आहे. आम्ही भारताबरोबर चर्चा करण्याच्या तयारीत होतो असा दावाही चीनने केला आहे.

चीनमधील सरकारी वृत्तपत्र असणाऱ्या ग्लोबल टाइम्सने चिनी लष्कराच्या प्रवक्त्याच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार परिस्थितीचा अंदाज घेऊन चिनी सैनिकांनी हाती काहीच पर्याय उपलब्ध नसल्याने करावाई केली. अपहरण प्रकरणामध्ये केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी ट्विटरवरुन काही प्रश्न उपस्थित केले. त्यानंतरच चीनकडून अरुणाचल संदर्भात हा दावा करण्यात आला आहे. ग्लोबल टाइम्समधील वृत्तानुसार चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजिआन यांनी, “चीनने कधीच ‘कथित’ अरुणाचल प्रदेशला मान्यता दिलेली नाही. हा भाग चीनच्या दक्षिण तिबेटचा हिस्सा आहे. या भागामध्ये बेपत्ता झालेल्या पाच भारतीयांसंदर्भात आमच्याकडे विचारपूस करण्यात आली आहे. मात्र त्यांच्याबद्दल आमच्याकडे कोणतीही माहिती नाही.” भारतीय लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, अरुणाचल प्रदेशमधील उंचावरील सुबनसिरी जिल्ह्यामधून पाच जणांचे चीनच्या पिपल्स लिब्रेशन आर्मीच्या (पीएलए) सैनिकांकडून अपहरण करण्यात आलं होतं. यासंदर्भात भारताने चीनकडे विचारणाही केली.

रविवारी रात्री केलेल्या एका ट्विटमध्ये रिजिजू यांनी चीनच्या लष्कराचा सहभाग असणाऱ्या या अपहरण प्रकरणाची माहिती देणारे ट्विट केलं. भारतीय सैन्य हे चीनच्या उत्तराची वाट पाहत आहे असंही त्यांनी यामध्ये म्हटलं होतं. “भारतीय लष्कराने पिपल्स लिब्रेशन आर्मीच्या केंद्राला संदेश पाठवला आहे. त्यांच्या उत्तराची वाट पाहत आहोत,” असं रिजिजू यांनी एका पत्रकाराच्या ट्विटला उत्तर देताना म्हटलं होतं. जून महिन्यामध्ये लडाखमधील गलवान खोऱ्यात झालेल्या हिंसक झटापटीमध्ये २० भारतीय जवान शहीद झाले होते. यानंतर दोन्ही देशांमधील तणाव अद्याप कायम आहे.

२९ आणि ३० ऑगस्टच्या रात्रीही दोन्हीकडील सैन्य आमने सामने आल्याचं भारतीय लष्कराने म्हटलं होतं. यामध्ये कोणत्याही सैनिकाला दुखापत झालेली नाही. भारतीय लष्कराने दिलेल्या माहितीनुसार चीनी लष्कराने सीमा भागामध्ये भारतीय प्रदेशात घुसखोरीची तयारी केली होती. मात्र भारतीय लष्कारने सतर्क राहून चीनचा हा इरादा हाणून पाडला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 8, 2020 8:03 am

Web Title: china has never recognized arunachal pradesh which is chinas south tibet region chinese fm spokesperson zhao lijian scsg 91
Next Stories
1 लडाखमध्ये भारत-चीनच्या जवानांमध्ये पुन्हा संघर्ष?; भारतानं गोळीबार केल्याचा पीएलएचा आरोप
2 करोनानंतर जगभर राष्ट्रवादाची लाट!
3 संरक्षण तंत्रज्ञानात भारताची नवी झेप
Just Now!
X