राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी रविवारी विजयादशमीनिमित्त संबोधन केलं. यामध्ये त्यांनी चीनविरोधात भारताला लष्करी ताकद वाढवावी लागेल असं भाष्य केलं. यावरुन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी संघावर आणि मोदी सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले, “संघाच्या प्रमुखांना तथ्य माहिती आहे की, चीनने आपली जमीन बळकावली. मात्र, संघ आणि भाजपाने ती त्यांना घेऊ दिली.”

राहुल गांधी ट्विटद्वारे म्हणाले, “खोलवर काय आहे याची खरी माहिती भागवत यांना आहे. त्यांना या सत्याला समोरं जायची भीती वाटते. खरं हे आहे की चीनने आपली जमीन बळकावली आणि त्यांना भारत सरकार आणि आरएसएसने परवानगी दिली.”

आपल्या भाषणात मोहन भागवत यांनी चीनला वर्चस्ववादी देश संबोधलं. तसेच ते म्हणाले, “भारताला चीनविरोधात आधिक शक्तीशाली व्हायची गरज आहे. तसेच सामरिक, आर्थिक, औद्योगिक बाबींमध्ये आपण चीनपेक्षा आधिक सक्षम होणं गरजेचं आहे. नेपाळ, बांग्लादेश, श्रीलंका या शेजारी राष्ट्रांशी संबंध सुधारण्याची, मित्रता टिकवण्याची गरज आहे. मतभेत होतात, ते दूर करुन चीनला टक्कर द्यायची असेल तर शेजारी राष्ट्रांशी संबंध चांगले ठेवणं गरजेचं आहे. मित्रता टिकवतो म्हणजे आम्ही कमजोर नाही. आपली मित्रता कुणाला कमजोरी वाटत असेल, अशा राष्ट्रांना आपण जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.”