पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यामध्ये वुहानमध्ये झालेल्या दोन दिवसीय अनौपचारिक शिखर परिषदेत काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. यात अफगाणिस्तानसंबंधी घेतलेला निर्णयामुळे पाकिस्तानच्या पोटात दुखू शकते. भारत आणि चीन अफगाणिस्तानमध्ये प्रथमच संयुक्त आर्थिक प्रकल्पावर एकत्र काम करणार आहेत. मोदी आणि जिनपिंग यांच्यामध्ये या प्रकल्पाबद्दल एकमत झाले आहे.

भारत आणि चीनच्या या निर्णयामुळे निश्चितच पाकिस्तान दुखावला जाऊ शकतो. कारण अफगाणिस्तानमध्ये भारताने हस्तक्षेप करु नये, भारताचे महत्व वाढू नये असे पाकिस्तानचे मत आहे. मोदी आणि जिनपिंग यांच्यात होणाऱ्या भेटीमुळे पाकिस्तान अस्वस्थ झाला होता. पाकिस्तानची हीच अस्वस्थतता लक्षात घेऊन चीनने पाकिस्तानसोबतच्या संबंधात कुठलाही फरक पडणार नाही. दोन्ही देशांचे संबंध पूर्वी होते तसेच दृढ राहतील असे चीनने आश्वासन दिले होते.

अफगाणिस्तानमध्ये भारताचे महत्व वाढू नये अशी पाकिस्तानची इच्छा आहे पण आता जिनपिंग यांनी भारतासोबत संयुक्त आर्थिक प्रकल्पावर काम करण्याचा निर्णय घेतला आहे.  मोदी आणि जिनपिंग यांनी अफगाणिस्तानसंबंधी घेतलेल्या या निर्णयामुळे दोन्ही देश आशियाई क्षेत्रात फक्त स्पर्धकच नसून परस्परांचे चांगले सहकारी असल्याचाही संदेश जाईल.

चीन अफगाणिस्तानमधील सर्वात मोठा गुंतवणूकदार देश आहे. अफगाणिस्तान सीपीईसीमध्ये सहभागी झाल्यानंतर तिथे रोड आणि रेल्वे नेटवर्क उभारण्यात येईल. ज्यामुळे चीनला आपला व्यवसाय विस्तार करता येईल. आर्थिक विकासातूनच अफगाणिस्तानची दहशतवादातून सुटका होईल असे चीनचे मत आहे. भारतालाही सीपीईसी प्रकल्पामध्ये सहभागी करुन घ्यायला चीन प्रयत्नशील आहे.