इंडियन एअर फोर्सचा तेजपूर एअरबेस आणि ओदिशाच्या किनाऱ्यावरील डॉ. अब्दुल कलाम बेटावर चीनच्या सैन्यदलाचे अत्यंत बारीक लक्ष आहे. या दोन्ही ठिकाणांवरील प्रत्येक हालचाल चीन रडारच्या माध्यमातून टिपत असतो. ओदिशाच्या किनाऱ्यावरील डॉ. अब्दुल कलाम बेट हा भारताचा मिसाइल परीक्षणाचा महत्त्वाचा तळ आहे. रणनितीक आणि भारताच्या लष्करी क्षमतेच्या दृष्टीने ही दोन्ही ठिकाणे खूप महत्त्वाची आहेत.

इंडिया टुडेच्या OSINT टीमने सॅटलाइटवरुन मिळवलेल्या फोटोंचे विश्लेषण केले. म्यानमार सीमेजवळ असलेल्या युनान प्रांतातून रडारच्या माध्यमातून चीन तेजपूर एअरबेस आणि डॉ. अब्दुल कलाम बेटावर लक्ष ठेवत असल्याचे संकेत या सॅटलाइट फोटोंवरुन मिळाले आहेत. डॉ. अब्दुल कलाम बेट आधी व्हीलर द्वीप म्हणून ओळखले जात होते. भारताचा तो मुख्य मिसाइल चाचणी तळ आहे.

भारत या बेटावर अण्वस्त्र वाहून नेणाऱ्या अग्नि ४ आणि छोटया पल्ल्याच्या अण्वस्त्र वाहून नेणाऱ्या क्षेपणास्त्रांची चाचणी करतो. तेजपूर विमानतळाचा नागरी आणि लष्करी दुहेरी कामांसाठी वापर होतो. इथे इंडियन एअर फोर्सचे सुखोई फायटर विमानांचे स्क्वाड्रन तैनात असते. सीमेपलीकडून कुठल्याही आव्हानाचा सामना करण्यासाठी तेजपूर बेस सज्ज आहे, असे अलीकडेच IAF ने म्हटले होते.

नवीन रडार स्टेशन बसवले
डोकलाममधील भारत-चीन-भूतान ट्राय जंक्शनवर २०१७ साली भारतीय आणि चिनी लष्कर आमने-सामने आले होते. ७३ दिवस तणाव होता. चीनचे बेकायदा बांधकाम भारताने रोखले होते. या डोकलाम संघर्षानंतर मार्च २०१८ नंतर चीनने नवीन रडार स्टेशन उभारले. म्यानमार सीमेपासून फक्त तीन किलोमीटर अंतरावर चीनचे हे रडार स्टेशन आहे. या रडार स्टेशनच्या रेंजचा पुरेपूर वापर करुन घेण्याचा चीनचा हेतू आहे.

चायना इलेक्ट्रॉनिक्स टेक्नोलॉजी ग्रुप कॉर्पोरेशनने टाइप-६०९ इंटेलिजन्स रडार सिस्टिम बनवली आहे. स्टेल्थ फायटर विमाने आणि बॅलेस्टिक मिसाइल शोधण्यासाठी चीनने हे रडार बनवले आहेत. तेजपूर एअर बेस आणि मिसाइल परीक्षण तळ या दोन्ही महत्त्वांच्या ठिकाणाहून २.५ किलोमीटरपेक्षा जास्त उंचीवर असलेली कुठलीही गोष्ट या  चिनी रडारच्या टप्प्यातून  सुटत नसल्याचे संकेत आहेत.