काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी हे कृषी कायद्यांविरोधात पंजाबमध्ये शेती वाचवा आंदोलनात सहभागी झाले आहेत. आज या आंदोलनाचा तिसरा आणि अखेरचा दिवस असून आंदोलनापूर्वी राहुल गांधी यांनी माध्यमांशी संवाद साधला. पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्यासोबत पार पडलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी अनेक मुद्द्यांवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. मोदी हे केवळ आपल्या प्रतीमेचं जतन करतात आणि त्यांनी आपली १ हजार २०० चौरस किलोमीटर जमीन चीनला देऊन टाकली, असा आरोप त्यांनी यावेळी केला.

“पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले भारताची जमीन कोणीही घेतली नाही. १ हजार २०० चौरस किलोमीटर जमीनीवर चीननं कब्जा केला. तो कसा केला? वर जी व्यक्ती बसली आहे ती केवळ आपली प्रतीमा जपते हे चीनला माहित आहे. आपली प्रतीमा जपण्यासाठी ते १ हजार २०० चौरस किलोमीटर जमीन आपल्याला देऊन टाकतील. हे संपूर्ण देशाला माहित आहे,” असं राहुल गांधी म्हणाले.

आणखी वाचा- देश कसा चालवतात हे पंतप्रधान मोदींना ठाऊक नाही- राहुल गांधी

“लष्कराच्या कोणत्याही जवानांना अधिकाऱ्यांना विचारा ते सांगतील की मोदी हे आपली प्रतीमा जपण्यासाठी देशाशी खोटं बोलले. ते भारत मातेची गोष्ट करतात. त्यांनी भारतमातेचे १ हजार २०० चौरस किलोमीटर चीनला देऊन टाकले. माना किंवा नका मानू पण हे सत्य आहे. याबाबत मोदी काय बोलतात?” असा सवालही त्यांनी केला.

आणखी वाचा- हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी गप्प का? – राहुल गांधी

पत्रकारांना का घाबरतात?

“मोदी पत्रकार परिषद का घेत नाहीत?, ते पत्रकाराच्या प्रश्नांना घाबरतात. चीन आणि पत्रकार दोघांनाही ते घाबरतात. चीन आपली प्रतीमा मलिन करेन किंवा पत्रकार आपली प्रतीमा मलिन करतील या गोष्टींची त्यांना भीती वाटते. बोगद्यातही एकटेच गेले हात उंचावतील, माध्यमांमध्ये मोनोपली आहे, माध्यमांमध्ये याचं प्रसारण होईलच. भारतात जे काही होतंय त्याच्याशी त्यांना काही घेणं देणं नाही,” असंही राहुल गांधी यांनी नमूद केलं.