जगभरात थैमान घालणाऱ्या करोना व्हायरस नंतर चीनच्या आणखी एका कृतीमुळे जगाची चिंता वाढली आहे. चीननं अवकाशात सोडलेल्या ‘लाँग मार्च ५ बी’ या रॉकेटवरील नियंत्रण सुटले आहे. आता ते त्याच्या नेमलेल्या जागेच्या ऐवजी दुसरीकडे पडणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. यामुळे ते रॉकेट नेमकं कुठे पडणार याची सर्वांनाच चिंता लागलेली आहे.

चीनच्या अंतराळ संशोधन संस्थेतर्फे २९ एप्रिलला ‘लाँग मार्च ५ बी’ या रॉकेटचे प्रक्षेपण करण्यात आले होतं. या रॉकेटचे वजन २१ टन आहे. चीनने अंतराळ बांधत असलेल्या नवीन अंतराळ स्थानकाचे हे पहिले मॉड्यूल लॉन्च केले होते. ठरवून दिलेल्या स्थानानुसार हे रॉकेट महासागात कोसळणार होते. मात्र आता रॉकेटवरील नियंत्रण सुटल्याने ते कोठे कोसळेल हे सांगता येणं कठीण होऊन बसलं आहे.

“काही दिवसांतच ते रॉकेट पृथ्वीवर कोसळणार आहे. १०० फूट लांब आणि १६ फूट रुंद असणारे हे रॉकेट अंतराळ स्थानकाच्या कामासाठी अवकाशात पाठवण्यात आले होते. रॉकेट अंतराळ पाठवण्यात आल्यानंतर बहुतेकवेळा ती महासागरातच कोसळतात. मात्र ‘लाँग मार्च ५ बी’ वरील नियंत्रण सुटल्याने ते जमिनीवर देखील कोसळू शकते,” अशी माहिती चीनच्या या अंतराळमोहिमेचे वार्तांकन करणारे अँड्र्यू जोन्स यांनी दिली आहे.

जोन्स यांच्या म्हणण्यानुसार, हे रॉकेट न्यूयॉर्क, माद्रिद, बीजिंग दक्षिण चिली, वेलिंग्टन आणि न्यूझीलंडच्या भागात कोसळू शकते. अंतराळात नवीन अंतराळ स्थानक उभारण्यासाठी २०२२ पर्यंत ११ रॉकेट पाठवण्याची चीनची योजना आहे. चीनने ‘लाँग मार्च ५ बी’ची चाचणी करण्यासाठी २०२० मध्ये ते प्रक्षेपित केले होतं. त्यावेळी सुद्धा नियंत्रण सुटल्याने ते सहा दिवसानंतर पृथ्वीवर कोसळलं होतं.