पाकिस्तानपाठोपाठ चीनही एखाद्या मोहिमेचा भाग असल्याप्रमाणे सीमा वाद निर्माण करीत आहे, असे  प्रतिपादन संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सोमवारी केले.

पूर्व लडाख सीमेवर गेल्या पाच महिन्यांहून अधिक काळ दोन्ही देशांमध्ये तणाव आहे. त्यावर भाष्य  करताना राजनाथ यांनी चीन सीमा वाद निर्माण करीत असल्याचे निदर्शनास आणले. ४४ पुलांचे उद्घाटन केल्यानंतर आभासी माध्यमातून झालेल्या कार्यक्रमात संरक्षणमंत्री बोलत होते.

राजनाथ म्हणाले, ‘‘उत्तर आणि पूर्व सीमांवरील परिस्थिती सर्वाना ज्ञात आहे. प्रथम पाकिस्तान आणि आता चीन एखाद्या मोहिमेचा भाग असल्याप्रमाणे सीमेवर तणाव निर्माण करीत आहे.’’ या दोन्ही देशांशी आपली सात हजार किलोमीटरची सीमा आहे. तेथील तणाव कायम आहे, असेही संरक्षणमंत्र्यांनी सांगितले.

करोनामुळे उद्भवलेली आव्हानात्मक परिस्थिती आणि पाकिस्तानबरोबर चीननेही सीमेवर तणाव निर्माण केल्यामुळे त्यांना तोंड देता-देता देशाच्या विकासाच्या सर्व क्षेत्रांत ऐतिहासिक बदल घडवून आणले जात आहेत, असेही राजनाथ यांनी स्पष्ट केले.

लडाख, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब आणि जम्मू-काश्मीरमधील प्रमुख भागांत बांधलेल्या या ४४ पुलांपैकी सात लडाखमधील आहेत. त्यामुळे लष्कराला हालचाली करणे आणि सैन्य, शस्त्रास्त्रे आणि रसद सीमेवर पोहोचवणे सोपे होईल.