राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अरुणाचल प्रदेशच्या दौऱ्यावर चीनने आक्षेप नोंदवत आगपाखड केली आहे. द्विपक्षीय संबंध निर्णायक क्षणापर्यंत आलेले असताना सीमावाद न चिघळवण्याची काळजी घ्यायला हवी असा सल्ला चीनने भारताला दिला आहे. राष्ट्रपती कोविंद हे रविवारी अरुणाचल प्रदेशच्या दौऱ्यावर गेले होते.

राष्ट्रपतींच्या या दौऱ्याबाबत चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या ल्यू कांग यांनी माध्यमांशी बोलताना आपली भुमिका मांडली. ‘चीनी सरकारने कधीही भारताने सांगितलेला अरुणाचल प्रदेश स्वीकारलेला नाही. या सीमाप्रश्नावर चीनची भुमिका स्पष्ट असल्याचे त्यांनी म्हटले आहे. कोणत्याही भारतीय अधिकाऱ्यांच्या अरुणाचल प्रदेशच्या दौऱ्याला चीनने नेहमीच विरोध केला आहे. मात्र, भारताने चीनच्या या भुमिकेला विरोध दर्शवत अरुणाचल प्रदेश भारताचे अभिन्न अंग असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे भारतीय सैन्य अरुणाचलमध्ये कोठेही मुक्त संचार करु शकते असे भारताने म्हटले आहे.

ल्यू यांनी म्हटले की, दोन्ही देश सीमाप्रश्नावर समाधानकारक तोडगा काढण्यासाठीच्या अंतिम प्रक्रियेत आहेत. अंतिम तोडग्यासाठी दोन्ही देशांनी शांतता राखण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. त्यामुळे भारतीय नेत्यांनी सीमावादाच्या क्षेत्रात दिलेल्या भेटीवर आक्षेप असल्याचे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

चीन आणि भारत यांची सीमारेषा ही सुमारे ३४८८ किमी इतकी आहे. चीनने नुकत्याच ६ नोव्हेंबर रोजी संरक्षण मंत्री निर्मला सीतारामण यांच्या अरुणाचल प्रदेशच्या दौऱ्यावरही आक्षेप घेतला होता. सीमावादावर तोडगा काढण्यासाठी भारत आणि चीनमध्ये आजवर १९ वेळा चर्चा झाल्या आहेत. २० वी चर्चा पुढील महिन्यांत दिल्लीत होणार आहे. मात्र, बैठकीची घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही. भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल आणि चीनचे सुरक्षा सल्लागार यांग जेची हे दोन उच्चाधिकारी सीमाप्रश्नावर चर्चेसाठी दोन्ही देशांचे विशेष प्रतिनिधीत्व करीत आहेत.