पूर्व लडाखमधील गलवान व्हॅलीत झालेल्या रक्तरंजित लष्करी संघर्षात २० भारतीय जवान शहीद झाले होते. या घटनेत चिनी सैनिकही मरण पावल्याचं सांगितलं जात होतं. मात्र, त्याबद्दल चीनने गुळणी धरली होती. अखेर पँगाँग सरोवर परिसरातून सैन्य मागे घेतल्यानंतर चीनने गलवान व्हॅलीतील संघर्षाबद्दल मौन सोडल असून, त्या घटनेत चिनी सैनिकही मारले गेल्याचं अधिकृतरित्या समोर आलं आहे. गलवानमध्ये पीएलएच्या अधिकाऱ्यांसह चार सैनिक मारले गेले होते. या चार सैनिकांना चीननं मरणोत्तर पदक दैऊन गौरवल्यानं ही माहिती समोर आली आहे.
करोनाच्या संकटानं मगरमिठी मारलेली असतानाच पूर्व लडाखमधील गलवान व्हॅलीत भारत व चिनी सैन्यामध्ये रक्तरंजित संघर्ष उफाळून आला होता. १५ जून २०२० रोजी मध्यरात्री हा लष्करी संघर्ष झाला होता. या घटनेत भारताचे २० जवान शहीद झाले होते. त्यानंतर दोन्ही देशातील संबंध कमालीचे ताणले गेले होते. त्याचबरोबर गलवान व्हॅलीतील संघर्षानं भारत-चीन सीमेवर युद्धसदृश्य स्थितीही निर्माण झाली होती.
या घटनेत भारताचे २० जवान शहीद झाले होते. त्याचबरोबर चिनी लष्कराचेही सैनिक मारल्या गेल्याचं वृत्त होतं, मात्र चीनने आपले सैनिक मारल्या गेल्याची वाच्यता केली नव्हती. त्यावरील पडदा अखेर दूर झाल आहे. ‘पीपल्स डेली’नं दिलेल्या माहितीनुसार चीनच्या केंद्रीय लष्करी आयोगाने काराकोरम पर्वतावर कर्तव्यावर असलेल्या आणि जूनमध्ये शहीद झालेल्या चार सैनिकांचा गौरव केला आहे. या चार सैनिकांना मरणोत्तर पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
Chinese top military body Central Military Commission awards 4 Chinese soldiers who lost their lives in the Galwan clash pic.twitter.com/JZ3ZeeIpWK
— ANI (@ANI) February 19, 2021
तर दुसरीकडे ‘ग्लोबल टाइम्स’च्या वृत्तानुसार गलवान व्हॅलीत पाच सैनिकांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. कमांडर क्यूई फबाओ, चेन होंगुन, जियानगॉन्ग, जिओ सियुआन आणि वाँग जुओरन अशी या जवानांची नावं आहे. यातील चौघांचा मृत्यू गलवान व्हॅलीतील संघर्षात झाला होता. तर एकाचा मृत्यू मदत मोहिमेदरम्यान नदीत वाहून गेल्यानं झाला होता.
भारतीय जवानांचा सन्मान
गलवान व्हॅलीत चिनी लष्कराबरोबर झालेल्या संघर्षात भारताचे २० जवान शहीद झाले होते. यात कर्नल संतोष बाबू यांनाही वीरमरण आलं होतं. संतोष बाबू यांचा मरणोत्तर महावीर चक्र पदकाने गौरव करण्यात आला आहे. त्याचबरोबर इतर पाच जवानांचा मरणोत्तर वीर चक्र देऊन सन्मान करण्यात आला आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 19, 2021 9:33 am