सरकारी अधिकारी व नोकरांना तसेच उद्योजकांना जनतेशी आणि प्रसारमाध्यमांशी प्रभावीपणे संवाद साधता यावा यासाठी चीनमध्ये राष्ट्रीय संवाद माध्यम प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आले आहे. कम्युनिस्ट चीनमध्ये प्रथमच अशा प्रकारचे केंद्र स्थापन करण्यात आले आहे, हे विशेष.
कम्युनिकेशन युनिव्हर्सिटी ऑफ चायना (सीयूसी) आणि चायना पब्लिक रिलेशन्स असोसिएशन (सीपीआरए) यांच्या एकत्रित प्रयत्नाने हे केंद्र उभारण्यात आले आहे. माध्यमयुगाच्या या काळात चीनी सरकारी अधिकारी आणि उद्योजक जनतेशी विन्मुख राहू शकत नाही. त्यांनी तसे राहू नये, जनतेशी अधिकाधिक सुसंवाद त्यांनी साधावा, सरकारच्या धोरणांची माहिती तळागाळापर्यंत पोहोचवावी या उद्देशाने हे केंद्र स्थापन करण्यात आले असल्याची माहिती सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस चेन वेनशेन यांनी स्पष्ट केले.
या केंद्रात एखाद्या मुद्दय़ावर प्रसारमाध्यमांशी कसे बोलावे. त्यांच्या प्रश्नांचे समाधानकारक उत्तरे देण्यासाठी कशा पद्धतीने तयारी करावी. कळीच्या मुद्दय़ावर देशाच्या ध्येयधोरणाला तडा जाणार नाही अशा पद्धतीची मुत्सद्दीपणे उत्तरे, विशेषत परदेशी प्रसारमाध्यमांना, कशी द्यावीत याचे प्रशिक्षण या केंद्रात दिले जाणार आहे.