भारत आणि नेपाळमधील ताणलेल्या संबंधांच्या पार्श्वभूमीवर चीनने काठमांडूसाठी नवा व्यापार मार्ग सुरू केला आहे. या मार्गाद्वारे चीन नेपाळला सर्व गरजेच्या वस्तूंचा पुरवठा करणार आहे. या सर्व गोष्टींसाठी नेपाळ याआधी केवळ भारतावर अबलंबून होता. गतवर्षी झालेल्या मधेसी आंदोलनाने भारताकडून नेपाळला होणाऱ्या पुरवठ्यात व्यत्यय आला आणि नेपाळने चीनचा पदर पकडला. चीन आणि नेपाळदरम्यान यासाठी एक सामंजस्य करार करण्यात आला. याअंतर्गत चीन नेपाळला इंधन, खाद्य तेल आणि अन्य वस्तूंचा पुरवठा करणार आहे. याच्या पुर्ततेसाठी चीनने पावले उचलण्यास सुरवात केली असून, चीनमधून बुधवारी पहिली मालगाडी तिबेटमार्गे काठमांडूसाठी रवाना झाली. चीनचे हे पाऊल भारतीय कुटनीतीसाठी मोठा धक्का आहे.
चीनचे सरकारी वृत्तपत्र ‘पीपुल्स डेली’मधील वृत्तानुसार, बुधवारी वायव्य चीनमधील गांसू प्रांताची राजधानी लांझोउ येथून ४३ डब्ब्यांची मालगाडी तिबेटकडे रवाना झाली. या मालगाडीत दैनंदिन वापराच्या वस्तू आणि घरगुती सामान भरण्यात आले आहे. नेपाळपासून जवळच असलेल्या शिगेजपर्यंत हे सामान पोहोचविण्यात येईल. नंतर जिलोंग बंदरावरून हे सामान रस्त्याने १६० किमी दूर नेपाळची राजधानी काठमांडूला नेण्यात येईल. बुधवारी रवाना करण्यात आलेल्या या सामानाला २४३१ किमीचा प्रवास रेल्वेने आणि ५६४ किमी अंतर रस्तामार्गे पार करायचा आहे. यासाठी दहा दिवसांचा कालावधी लागेल.
संयुक्तरित्या सुरू करण्यात आलेल्या रेल्वे-रस्तामार्ग सेवेमुळे चीनच्या गांसू, किंघाई आणि तिबेटमधील परिसरातील औद्योगिकीकरणास चालना मिळणार असल्याचे ‘पीपुल्स डेली’ने म्हटले आहे. नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी मार्च महिन्यात चीनचा दौरा केला होता. त्यावेळी दोन्ही देशांनी महत्वपूर्ण सामंजस्य करारांवर साक्षऱ्या केल्या होत्या.