बीजिंग : आण्विक साहित्य पुरवठादार गटाच्या (एनएसजी) अस्ताना येथे होणाऱ्या बैठकीत भारताला सदस्यत्वाचा मुद्दा विषयसूचीवर नाही, असे चीनने सूचित केले आहे.

अण्वस्त्र प्रसारबंदी करारावर स्वाक्षरी न करणाऱ्या भारतासारख्या देशांना या गटात प्रवेश देण्याबाबत सहमती होणे आवश्यक आहे, अशी भूमिका चीनने घेतली आहे. चीनने नेहमीच भारताचा एनएसजीमधील प्रवेश रोखण्याचा प्रयत्न केला आहे. आण्विक साहित्य पुरवठादार गट ही ४८ देशांची संघटना असून ती जागतिक अणुसाहित्य व्यापाराचे नियंत्रण करते. भारताने एनएसजी सदस्यत्वासाठी मे २०१६ मध्ये अर्ज केला असून चीनने भारताला हे सदस्यत्व देण्यास विरोध केला आहे. ज्या देशांनी अण्वस्त्र प्रसारबंदी करारावर स्वाक्षरी केली आहे, त्यांनाच या संघटनेचे सदस्यत्व मिळावे, असे चीनचे म्हणणे आहे.

भारत व पाकिस्तान या दोन्ही देशांनी अण्वस्त्रप्रसार बंदी करार म्हणजे एनपीटीवर स्वाक्षरी केलेली नाही. भारताला एनएसजीमध्ये प्रवेश देण्याबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नांवर चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते लु कांग यांनी सांगितले, की चीनची आधीचीच भूमिका कायम आहे.

कझाकस्थानातील अस्ताना येथे संघटनेची बैठक  होत असून त्यात भारताला सदस्यत्व देण्याचा कुठलाही मुद्दा विचारार्थ नाही. इतर सदस्य देशांत याबाबत मतैक्य झाल्याशिवाय भारताला हे सदस्यत्व देण्यात येऊ नये. भारताला सदस्यत्व नाकारण्याचे आम्ही प्रयत्न केलेले नाहीत. केवळ एनएसजीचे नियम व प्रक्रिया यांचे पालन करण्याचा आग्रह धरला आहे, असा खुलासाही त्यांनी केला.

भारतीय औषधांच्या निर्यातीसाठी आग्रह

बीजिंग : चीनमध्ये भारतीय औषध उत्पादनांची निर्यात वाढवण्यासाठी भारताने शुक्रवारी ‘डाइंग टू सव्‍‌र्हाइव्ह’ या चिनी चित्रपटाचा आधार घेत आपली बाजू मांडली. भारतीय औषधांना बाजारपेठेत प्रवेश देण्यासाठी चीनने मार्ग निश्चित करावा, असे दोन्ही देशांदरम्यान शांघाय येथे झालेल्या बैठकीत स्पष्ट करण्यात आले.