बीजिंग : चीनमध्ये २०१९ मध्ये ज्या वुहानमधून करोनाची सुरुवात झाली होती तेथे आता पुन्हा एकदा चाचण्यांचे प्रमाण वाढवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
वुहानची लोकसंख्या १.१ कोटी असून तेथे रुग्णांची संख्या वाढत असल्याने चाचण्या वाढवण्यात येणार आहेत. सोमवारी तेथे तीन रुग्ण सापडले असून वर्षभरात प्रथमच देशातच राहिलेले रुग्ण सापडले आहेत. चीनने करोना साथीवर यशस्वी मात केली असून २०१९ मध्ये वुहानमध्ये करोनाचा प्रसार वेगात होता. अनेक ठिकाणी स्थानिक टाळेबंदी करून व सामूहिक चाचण्या करून तसेच लोकांना विलगीकरणात ठेवून ही साथ आटोक्यात आणली गेली होती.  सध्याचा उद्रेक फार मोठा नसला तरी एकूण रुग्णांची संख्या शंभराहून अधिक झाली आहे. आताचा विषाणू हा आधीच्या विषाणूपेक्षा जास्त वेगाने पसरत असून बीजिंगमध्येही करोनाचे रुग्ण सापडले आहेत. यातील अनेक रुग्ण हे भारतात प्रथम आढळून आलेल्या डेल्टा विषाणूचे आहेत. राष्ट्रीय आरोग्य आयोगाने म्हटले आहे की,  यापूर्वी सापडलेले ६१ रुग्ण हे स्थानिक संक्रमणाचे असून २९ रुग्ण हे बाहेरून आलेल्यांपैकी आहेत. स्थानिक संक्रमणाचे रुग्ण जियांत्सू येथील असून नानजिंग येथील विमानतळावर रशियातून आलेल्या विमानातील कर्मचाऱ्यांमार्फत विषाणू पसरला होता. यांगझाऊ या  शहरातही नंतर त्याचा प्रसार झाला.