भारतापेक्षा चीन आणि पाकिस्तानकडे जास्त अण्वस्त्रे उपलब्ध आहेत. युद्ध आणि शस्त्रास्त्रांची माहिती ठेवणाऱ्या एका आघाडीच्या थिंक टॅँकने प्रकाशित केलेल्या न्यू ईयरबुकमधून ही माहिती समोर आली आहे. या माहितीमुळे चीन आणि पाकिस्तानला शेजारी देशांबरोबर शांतता प्रस्थापित करण्यामध्ये खरोखर रस आहे का? हा प्रश्न निर्माण होतो.

सध्या पूर्व लडाखमध्ये चीनने केलेल्या घुसखोरीमुळे तणाव निर्माण झाला आहे. दोन्ही देशांकडून हा वाद चर्चेच्या माध्यमातून सोडवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. स्टॉकहोल्म इंटरनॅशनल पीस रिसर्च संस्थेच्या इयरबुक २०२० नुसार चीनच्या शस्त्रागारात ३२० अण्वस्त्रे तर पाकिस्तानकडे १६० आणि भारताकडे १५० अण्वस्त्रे उपलब्ध आहेत. जानेवारी २०२० पर्यंतच्या अण्वस्त्रांची ही संख्या आहे. हिंदुस्थान टाइम्सने हे वृत्त दिले आहे.

एसआयपीआरआय संस्थेच्या अहवालानुसार २०१९ च्या सुरुवातीला अण्वस्त्रांच्या बाबतीत हे तिन्ही देश याच क्रमवारीमध्ये होते. त्यावेळी चीनकडे २९०, पाकिस्तानकडे १५० ते १६० आणि भारताकडे १३० ते १४० दरम्यान अण्वस्त्रे उपलब्ध होती. पूर्व लडाखमध्ये नियंत्रण रेषेवर भारत आणि चीन दोन्ही देशांमध्ये तणावाची स्थिती निर्माण झालेली असताना अण्वस्त्रांची ही संख्या समोर आली आहे.

लडाख ते उत्तराखंड, सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेशपर्यंत दोन्ही देशांनी सीमेजवळ आपले सैन्य आणून ठेवले आहे. चीन आपल्या अण्वस्त्र शस्त्रागाराचे आधुनिकीकरण करत असून जमीन, समुद्र आणि हवेतून अण्वस्त्र डागण्याची क्षमता अधिक विकसित करण्याचा त्यांचा प्रयत्न करत असल्याचे स्टॉकहोल्म इंटरनॅशनल पीस रिसर्च संस्थेच्या इयरबुकमध्ये म्हटले आहे.

सीमाप्रश्नाची माहिती योग्यवेळी संसदेत
भारत आपल्या देशाभिमानाशी कुठलीही तडजोड करणार नाही, तसेच आता आमचा देश कमकुवत राहिलेला नाही. त्याची संरक्षण क्षमता खूप वाढली आहे, अशी ग्वाही संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी रविवारी दिली.
चीनसोबत उद्भवलेल्या लडाख सीमा वादाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ही ग्वाही दिली. जम्मू काश्मीरसाठीच्या आभासी सभेत त्यांनी असे आश्वासित केले, की केंद्र सरकार हे विरोधक किंवा संसदेला सीमेवरील घडामोडींबाबत अंधारात ठेवणार नाही. योग्य वेळी सगळा तपशील विरोधक, संसद यांना सांगितला जाईल.