प्रसंग कोणताही असो, पाकिस्तान नेहमीच चीनचा सहकारी राहिला आहे, त्यामुळे यापुढेही दोन्ही देशांमधील संबंध कोणत्याही स्थितीत अधिकाधिक बळकटच होतील, असे आश्वासन चीनचे पंतप्रधान ली केक्वियांग यांनी बुधवारी पाकिस्तानचे अध्यक्ष झरदारी यांना दिले. चीनच्या पंतप्रधानांचे दोन दिवसांच्या पाकिस्तान भेटीसाठी येथे आगमन झाले असून त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. त्यानंतर ली यांच्या सन्मानार्थ झरदारी यांनी प्रीतीभोजन आयोजित केले होते. प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय परिस्थिती कशा प्रकारे उद्भवेल त्याची आम्हाला चिंता नाही, चीन आणि पाकिस्तानचे संबंध नेहमीच सहकार्याचे राहतील, असे ली केक्वियांग म्हणाले.
पाकिस्तानसमवेत वाढते मैत्रीपूर्ण संबंध हे चीन सरकारचे ठोस धोरण आहे. स्वातंत्र्य, सार्वभौमत्व, प्रादेशिक एकात्मता आणि राष्ट्रीय स्थैर्य व विकास साध्य करण्यासाठी पाकिस्तान प्रयत्नशील असून चीन त्याला सदैव पाठिंबा देईल, असेही ली यांनी स्पष्ट केले.
आंतरराष्ट्रीय पातळीवर कोणतेही चित्र निर्माण झाले तरी चीनचे पाकिस्तानसमवेत संबंध नेहमीच बळकट राहतील, असा संदेश आंतरराष्ट्रीय समुदायाला देण्यासाठी आपण पाकिस्तानच्या दौऱ्यावर आलो आहोत, असे सांगून ली यांनी पाकिस्तान सरकार आणि देशातील जनतेला शुभेच्छा दिल्या.
चीनच्या पंतप्रधानांचे पाकिस्तानात आगमन
चीनचे पंतप्रधान ली केक्वियांग यांचे दोन दिवसांच्या पाकिस्तान भेटीसाठी बुधवारी इस्लामाबाद येथे आगमन झाले. त्यांचे पाकिस्तानात भव्य स्वागत करण्यात आले. परस्परसंबंध आणि आर्थिक सहकार्यावर प्रकाशझोत टाकण्यासंदर्भात प्रादेशिक प्रश्नांवर ते चर्चा करणार आहेत.
इस्लामाबाद येथील लष्करी हवाई तळावर पाकिस्तानचे अध्यक्ष झरदारी आणि काळजीवाहू पंतप्रधान मीर हजर खान खोसो यांनी ली केक्वियांग यांचे स्वागत केले. हवेत गोळीबाराच्या १९ फैरी झाडून त्यांना मानवंदना देण्यात आली. या वेळी तिन्ही दलांचे प्रमुख आणि अन्य नागरी, लष्करी अधिकारी उपस्थित होते.
ली यांच्यासमवेत उच्चस्तरीय शिष्टमंडळही आले असून त्यामध्ये मंत्रिमंडळातील मंत्री, बडे उद्योगपती आणि अधिकारी यांचा समावेश आहे. काळजीवाहू पंतप्रधान खोसो यांच्याशी ली चर्चा करणार असून त्यानंतर दोन्ही नेते संयुक्तपणे पत्रकार परिषद घेणार आहेत.
ली यांना पाकिस्तानचा सर्वोच्च नागरी किताब ‘निशान-ए-पाकिस्तान देऊन गौरविण्यात येणार आहे. नवाझ शरीफ गुरुवारी ली केक्वियांग यांची भेट घेणार आहेत. विज्ञान, तंत्रज्ञान, आर्थिक, अंतराळ क्षेत्रात समझोता करार करण्यात येणार आहेत.