News Flash

‘चीन-पाकिस्तानची मैत्री पोलादापेक्षा मजबूत आणि मधाहून गोड’

चीनच्या उपपंतप्रधानांची स्तुतीसुमने

संग्रहित छायाचित्र

चीनचे उपपंतप्रधान वांग यांग यांनी पाकिस्तानला स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ‘चीन आणि पाकिस्तानची मैत्री पोलादापेक्षा जास्त मजबूत आणि मधापेक्षाही अधिक गोड आहे,’ अशा शब्दांमध्ये वांग यांग यांनी पाकिस्तानसोबतच्या मैत्रीचे वर्णन केले. इस्लामाबादमधील सभागृहात पाकिस्तानचा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. या समारंभाला चीनचे उपपंतप्रधान उपस्थित होते. चीन आणि पाकिस्तान प्रतिकूल परिस्थितीतही एकमेकांसोबत ठामपणे उभे आहेत, असे वांग यांनी या कार्यक्रमात बोलताना म्हटले.

‘चीन आणि पाकिस्तान संकटाच्या काळात एकमेकांच्या साथीने भक्कमपणे उभे आहेत. काळाच्या कसोटीवर ही मैत्री कायम टिकेल आणि येणाऱ्या पिढ्यांमुळे दोन्ही देशांमधील मैत्री आणखी मजबूत होईल,’ अशा शब्दांमध्ये चीनच्या उपपंतप्रधानांनी द्विपक्षीय संबंधांवर भाष्य केले. सोमवारी पाकिस्तानचा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. यावेळी पाकिस्तानचे राष्ट्रपती ममनून हुसेन यांनी झेंडावंदन केले. यानंतर पाकिस्तानी लष्कराकडून ३१ तोफांची सलामी देण्यात आली. या कार्यक्रमाला पाकिस्तानचे पंतप्रधान शाहिद खकान अब्बासी आणि तिन्ही दलांचे प्रमुख उपस्थित होते.

‘आपण सर्व मतभेद संपवून मातृभूमीच्या विकासासाठी आणि संपन्नतेसाठी योगदान देऊ. द्वेष आणि गैरसमज दूर करुन आपण प्रेम आणि सद्भावना वाढवू,’ अशा शब्दांमध्ये पाकिस्तानचे राष्ट्रपती हुसेन यांनी देशवासियांना संबोधित केले. याआधी पाकिस्तानचे लष्करप्रमुख कमर जावेद बाजवा यांनी रविवारी मध्यरात्री वाघा सीमेवर पाकिस्तानातील सर्वात मोठा ध्वज फडकावला. या ध्वजाची लांबी १२० फूट आणि रुंदी ८० फूट होती. ४०० फूट उंचीवर बाजवा यांनी पाकिस्तानचा ध्वज फडकावला. ‘आम्ही पाकिस्तानमधील प्रत्येक दहशतवाद्याला फासावर देऊ,’ असे लष्कर प्रमुखांनी ध्वजवंदनानंतर म्हटले.

‘आमचे शत्रू भले पूर्वेला असोत वा पश्चिमेला, आमचे जवान त्यांच्यासमोर कधीही झुकणार नाहीत,’ अशा शब्दांमध्ये पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांनी भारत आणि अफगाणिस्तानवर शरसंधान साधले. ‘ज्या शक्ती पाकिस्तानला कमकुवत करण्याचा प्रयत्न करतील, त्यांचे प्रयत्न पाकिस्तानी सैन्य आणि इतर संस्था हाणून पाडतील,’ असे म्हणत त्यांनी पाकिस्तानमधील आणि पाकिस्तानबाहेरील धोक्यांवर त्यांनी भाष्य केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 14, 2017 4:33 pm

Web Title: china pakistan friendship is stronger than steel says chinese deputy prime minister
Next Stories
1 ‘गोरखपूर रूग्णालयातील मृत्यू’ ही देशातली पहिली दुर्घटना नाही-अमित शहा
2 ‘विभक्त’ जनता दल, २१ पदाधिकाऱ्यांची पक्षातून गच्छंती
3 … आणि तो व्यापारी पत्नी व मुलादेखत जिवंत जळाला
Just Now!
X