News Flash

चीनच्या कूटनीतीला मोदी यांचा धक्का

चीन-पाकिस्तान संबंधांचाही पंतप्रधानांनी अप्रत्यक्षरीत्या समाचार घेतला

जागतिक समुदायाला मदत करण्याबाबत मोदी म्हणाले की, फक्त शेजारी देशांना मदत करण्यापुरता आपण आपले प्रयत्न मर्यादीत ठेवू नये, संपूर्ण जगाला लशी, औषधांचा पुरवठा करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. (संग्रहित छायाचित्र)

शुभजित रॉय, नवी दिल्ली : लडाखमधील तणावामुळे भारताचे चीनसोबतचे संबंध घसरणीला लागले असतानाच, चीनच्या कर्ज देऊन अडकवण्याच्या कूटनीतीचा(डेट ट्रॅप डिप्लोमसी) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाचार घेतला. भागीदार देशाला अंकित ठेवण्याचा कुठलाही कुटिल हेतू न बाळगता भारत इतर देशांशी विकासात्मक भागीदारी बळकट करतो, असे त्यांनी सांगितले. भारताकडून एखाद्या देशाबाबत मैत्रीचे कुठलेही संकेत कुठल्याही तिसऱ्या देशाच्या विरोधासाठी नसतात, अशा शब्दांत चीन-पाकिस्तान संबंधांचाही पंतप्रधानांनी अप्रत्यक्षरीत्या समाचार घेतला.चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांच्या विशेषत: भारताच्या शेजारी देशांतील ‘बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह’मधून उघड झालेल्या चीनच्या कर्ज-सापळा कूटनीतीची मोदी यांनी अशा रीतीने कडक शब्दांत कानउघाडणी केली.

‘भारत जेव्हा एखाद्या देशापुढे मैत्रीचा हात करतो, तेव्हा ते कुठल्या तिसऱ्या देशाविरोधात नसते. भारताने स्वत:च्या हितसंबंधांचा नव्हे, तर नेहमीच संपूर्ण मानवजातीच्या हिताचा विचार केला आहे’, असे संयुक्त राष्ट्र आमसभेत केलेल्या २२ मिनिटांच्या भाषणात मोदी यांनी सांगितले.

जगातील सर्वात मोठी लोकशाही आणि १.३ अब्ज लोक राहात असलेल्या भारताला संयुक्त राष्ट्रांच्या निर्णय घेणाऱ्या संरचनेतून आणखी किती काळ बाहेर ठेवले जाणार आहे, असा प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी विचारला. संयुक्त राष्ट्रांचा प्रतिसाद, प्रक्रिया आणि स्वरूप यांच्यात सुधारणा होणे ही काळाची गरज असल्याचेही त्यांनी ठामपणे सांगितले.

करोनाविरुद्धच्या लढय़ात संयुक्त राष्ट्रांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
‘गेले आठ ते नऊ महिने सारे जग करोनाशी लढत आहे. या महामारीविरुद्धच्या संयुक्त लढय़ात संयुक्त राष्ट्र कुठे आहे? या मुद्दय़ावर त्याचा परिणामकारक प्रतिसाद कुठे आहे?’ अशी थेट विचारणा मोदी यांनी केली. या महामारीच्या सध्याच्या अत्यंत कठीण काळातही भारताच्या औषधनिर्माण उद्योगाने जगातील दीडशेहून अधिक देशांना आवश्यक औषधे पाठवली आहेत, याचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 27, 2020 8:07 am

Web Title: china pakistan in mind pm to spell out india priorities at unga nck 90
Next Stories
1 भारताला किती काळ डावलणार?
2 ‘जीएसटी’ निधी इतरत्र वळविला नाही!
3 इशर अहलुवालिया यांचे निधन
Just Now!
X