भारतीय गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार पाकव्याप्त काश्मीरमध्ये लष्करी पायाभूत सुविधा उभारण्यात येत असून यासाठी पाकिस्तानला चीन सहाय्य करत आहे. इंडियन एक्सप्रेसने सुत्रांच्या हवाल्यानं दिलेल्या वृत्तानुसार पाकव्याप्त काश्मीरमध्ये क्षेपणास्त्र डागता येणारी यंत्रणा उभारण्यात येत असून त्यासाठी पाकिस्तानला चीन मदत करत आहे. भारत चीनमध्ये लडाख सीमेवर तणावाचे वातावरण असून लष्करानं दोन आघाड्यांवर लढण्यास आपण सक्षम असल्याचं सांगितलं आहे.

जमिनीवरून हवेत मारा करू शकणाऱ्या क्षेपणास्त्रांसाठी पाकव्याप्त काश्मीरमधील लसाडाणा ढोक इथं पाकिस्तान व चीनचं लष्कर एकत्र बांधकाम करत असल्याचं सुत्रांनी सांगितलं आहे. पाकिस्तानचे जवळपास १३० जवान व २५ ते ४० नागरिक या ठिकाणी काम करताना आढळले आहेत. पाकव्याप्त काश्मीरमधील या साईटचं नियंत्रण पाकिस्तानी लष्कराच्या बाघ जिल्ह्यातील मुख्यालयातून करण्यात येणार आहे.

गुप्तचर यंत्रणांना असंही समजलं आहे की, चिनी लष्कराचे १० अधिकारी या नियंत्रण कक्षामध्ये तैनात असतील. विशेष म्हणजे पाकव्याप्त काश्मीरमधल्या झेलम जिल्ह्यातील चिनारीमध्ये व हाथियान बाला जिल्ह्यातील चाकोठी येथेही अशाच प्रकारचं बांधकाम करण्यात येत असल्याची माहिती आहे. पाकिस्तान व चीन या दोन्ही देशांची लष्करं एकमेकांच्या संपर्कात असून उच्च स्तरावरील अधिकारी एकमेकांच्या सतत संपर्कात असल्याचं जून महिन्यात भारतीय लष्करी यंत्रणांच्या लक्षात आलं होतं.

तीनच दिवसांपूर्वी भारताचे हवाई दल प्रमुख आरकेएस भादुरिया यांनी सांगितलं होतं की पाकिस्तान व चीन एकमेकांना सहकार्य करत असल्याची आपल्याला कल्पना असून लष्करी साधन सामग्रीसाठी पाकिस्तान चीनवर अवलंबून आहे. चीन पाकिस्तानला मदत करत असल्याचं दिसत आहे, परंतु भारत परिस्थितीवर लक्ष ठेवून असून गरज पडल्यास दोन आघाड्यांवर लढण्यास आपण सज्ज असल्याचंही भादुरियांनी स्पष्ट केलं आहे.