चीन आणि पाकिस्तानने जेफ-१७ या फायटर विमानांची मारक क्षमता आणखी वाढवण्याचा कार्यक्रम सुरु केला आहे. मागच्या महिन्यात नियंत्रण रेषेवर भारतीय फायटर विमानांबरोबर झालेल्या डॉगफाइटमध्ये पाकिस्तानने जेफ-१७ विमानांचा वापर केला होता. जेफ-१७ हे चीन आणि पाकिस्तानने संयुक्तपणे विकसित केलेले विमान आहे.

जेफ-१७ ब्लॉक तीनचा विकास आणि उत्पादन सुरु आहे असे यांग वी यांनी सांगितले. चीन-पाकिस्तानने मिळून बनवलेल्या जेफ-१७ या फायटर विमानाचे यांग हे मुख्य डिझायनर आहेत. २७ फेब्रुवारीला २४ पाकिस्तानी फायटर विमाने भारताच्या दिशेने आली होती. त्यावेळी झालेल्या डॉगफाईटमध्ये भारतीय फायटर विमानांनी पाकिस्तानी फायटर विमानांना पिटाळून लावले.

या डॉगफाइटमध्ये पाकिस्तानच्या अत्याधुनिक एफ-१६ विमानांबरोबर जेफ-१७ ही विमाने सुद्धा होती. जेफ-१७ चे सध्याचे व्हर्जन हे भारताच्या स्वदेशी बनावटीच्या तेजस विमानाच्या तोडीचे आहे. जेफ-१७ ची शस्त्रास्त्र वाहून नेण्याची आणि युद्धक्षमता वाढवण्याच्या दृष्टीने आधुनिकीकरण करण्याचे आपले लक्ष्य आहे असे यांग यांनी सांगितले. जेफ-१७ च्या रडारच्या आधुनिकीकरणासह एकाचवेळी वेगवेगळया लक्ष्यांवर हल्ला करण्याच्या दृष्टीने बदल करण्यात येणार आहेत.

एव्हिएशन इंडस्ट्री कॉर्पोरेशन ऑफ चायनाच्या संकेतस्थळावरील माहितीनुसार जेफ-१७ हे सिंगल इंजिन मल्टीरोल फायटर विमान आहे. अन्य देशांना विकण्याच्या हेतूने चीन-पाकिस्तानने या विमानांची निर्मिती केली आहे.