06 August 2020

News Flash

ब्रह्मपुत्रेचा प्रवाह बदलण्याची चीनची योजना

चीनच्या ताब्यातील तिबेटमधून भारतात वाहणाऱ्या ब्रह्मपुत्रा नदीचा प्रवाह वळवण्याची योजना चीनने आखली आहे.

संग्रहित छायाचित्र

भूतानमधील डोकलामच्या प्रश्नावरून भारत आणि चीनमध्ये निर्माण झालेला तणाव निवळल्याला काही दिवस उलटले नाही, तोच चीनने नवी कुरापत केल्याने दोन्ही देशांत पुन्हा नवा वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत. चीनच्या ताब्यातील तिबेटमधून भारतात वाहणाऱ्या ब्रह्मपुत्रा नदीचा प्रवाह वळवण्याची योजना चीनने आखली आहे. या महाप्रचंड प्रकल्पाची रंगीत तालीम म्हणून त्याच्या तुलनेत एका लहान प्रकल्पाचे कामकाज त्यांनी सुरू केले असल्याचे वृत्त ‘साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट’ या वृत्तपत्राने दिले आहे. या प्रकल्पानंतर झिनजिअँगच्या वैराण प्रदेशाचा कॅलिफोर्निया होईल, असे प्रकल्पात सहभागी तंत्रज्ञाने म्हटले आहे. मात्र हे प्रकल्प मार्गी लागल्यास भारताच्या ईशान्येकडील राज्ये आणि बांगलादेश यांच्या जीवन-मरणाचा प्रश्न उभा राहणार आहे.

ब्रह्मपुत्रा नदीला चीनमध्ये यार्लुग त्सांगपो म्हणतात. ती तिबेटमधील सांग्री भागात वळण घेऊन भारतात प्रवेश करते. या ठिकाणी नदीच्या प्रवाहात कृत्रिम बेट निर्माण करून तिचा प्रवाह बदलण्याची व ते १० ते १५ अब्ज टन पाणी तिबेटच्या पठारावरील १००० किलोमीटर लांब बोगद्यातून चीनच्या पश्चिमेकडील झिनजिअँग (सिकिअँग) प्रांतातील टाकलामकान वाळवंटात नेण्याची चीनची अतिमहत्त्वाकांक्षी योजना आहे. या प्रकल्पाचा अभ्यास करण्यासाठी चीनने १०० हून अधिक शास्त्रज्ञांचे देशभरात विविध अभ्यासगट स्थापन केले आहेत.

झाले काय?

भारतात येणाऱ्या नदीचा प्रवाह बदलण्याच्या प्रयोगाचा प्रस्ताव चीन सरकारला मार्च महिन्यात सादर करण्यात आला. मात्र या प्रकल्पाला अद्याप चिनी सरकारची मंजुरी मिळालेली नाही. तूर्तात या मोठय़ा प्रकल्पाची पूर्वतयारी म्हणून ६०० किलोमीटरहून अधिक लांबीचा तसाच बोगदा चीनच्या युनान प्रांतात बांधण्याची योजना आहे. या प्रकल्पाचे काम ऑगस्ट महिन्यात सुरू करण्यात आले. या लहान प्रकल्पात मोठय़ा प्रकल्पासाठी लागणारे तंत्रज्ञान व साधनसामग्री विकसित करण्यात येणार आहे.

होणार काय?

भारताने यापूर्वी चीन तिबेटमधून भारतात येणाऱ्या नद्यांवर बांधत असलेल्या प्रकल्पांवर आक्षेप घेऊनही चीनने त्याला सकारात्मक प्रतिसाद दिलेला नाही. समजा या प्रकल्पाला मंजुरी मिळाली, तर दोन्ही देशांत यावरून मोठे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

ब्रह्मपुत्रेचा प्रवाह बदलण्याच्या यापूर्वीच्या योजना मोठा खर्च, पर्यावरणविषयक धोके आणि तांत्रिक क्षमतेअभावी बासनात गुंडाळण्यात आले होते. आताही या प्रकल्पाच्या व्यवहार्यतेवर शंका उपस्थित केली जात आहे. १००० किलोमीटरच्या बोगद्याच्या १ किलोमीटर लांबीच्या प्रत्येक टप्प्यासाठी १ अब्ज युआन खर्च येईल. म्हणजे प्रकल्पाचा एकूण खर्च १ ट्रिलियन युआन इतका असेल. ही रक्कम चीनमधील ‘थ्री-गॉर्जेस’ धरण प्रकल्पाच्या पाचपट असेल, असे या वँग वी या संशोधकाने साऊथ चायना मॉर्निंग पोस्टला सांगितले. वँग वी या प्रकल्पाच्या रचनेत सहभागी असून चेंगडू प्रांतातील सिचुआन विद्यापीठाच्या ‘स्टेट की लॅबोरेट्री ऑफ हायड्रॉलिक्स अँड माऊंटन रिव्हर इंजिनिअरिंग’ या संस्थेत काम करतात.

आज या प्रकल्पाचे तंत्रज्ञान उपलब्ध नसले आणि खर्च आवाक्याबाहेरचा वाटत असला तरी त्याचे फायदे पाहता एके दिवशी हा प्रकल्प नक्की राबवला जाईल. पुढील ५ ते १० वर्षांत त्यासाठीचे तंत्रज्ञान उपलब्ध असेल आणि खर्च कमी झाला असेल, असे झँग चुआंकिंग यांनी सांगितले. ते वुहान येथील ‘चायनीज अ‍ॅकॅडेमी ऑफ सायन्सेसच्या इन्स्टिटय़ूट ऑफ रॉक अँड सॉईल मॅकॅनिक्स’ या संस्थेत संशोधक आहेत. त्यांनीच युनानमधील ६०० किमीच्या बोगद्याची योजना तयार केली आहे. त्याला ऑगस्टमध्ये सुरुवात झाली असून त्याची किंमत ७८ अब्ज युआन असेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 31, 2017 3:23 am

Web Title: china plan to change the flow of brahmaputra river
Next Stories
1 वातावरणातील कार्बनच्या प्रमाणात उच्चांकी वाढ
2 ‘आधार’विरोधातील याचिकांसाठी न्यायालय घटनापीठ स्थापन करणार
3 केरळमधील ‘त्या’ धर्मातरित तरुणीला न्यायालयासमोर हजर करण्याचे आदेश
Just Now!
X