गलवान खोऱ्यातील रक्तरंजित संघर्षाची घटना अचानक घडलेली नाही. चिनी सैन्याने पद्धतशीरपणे कट रचून भारतीय सैनिकांबरोबर हा हिंसक संघर्ष केला. अमेरिकन आयोगाने काँग्रेसला सादर केलेल्या रिपोर्टमधून हा निष्कर्ष काढला आहे. जून महिन्यात गलवान खोऱ्यात भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये हिंसक चकमक झाली होती. यात भारताचे २० जवान शहीद झाले तर चिनी सैनिकही ठार झाले होते.

भारत-चीनमध्ये नियंत्रण रेषेवर आठ महिन्यांपासून सुरु असलेला सीमावाद मागच्या काही दशकातील गंभीर सीमावाद आहे असे अमेरिका-चीन आर्थिक आणि सुरक्षा आढावा आयोगाच्या अहवालात म्हटले आहे. चीनने आधीपासूनच या संघर्षाची तयारी केली होती, असे काही पुराव्यांवरुन संकेत मिळत आहेत. या संघर्षाच्या काही आठवडेआधी चीनचे संरक्षण मंत्री वी यांनी स्थिरतेसाठी लढाई लढण्याला प्रोत्साहन दिले होते. याचे दाखले रिपोर्टमध्ये देण्यात आले आहेत.

चीनने गलवान खोऱ्यात मोठया प्रमाणावर सैन्याची जमावजमव केली होती. घटनेच्या आठवडाभरआधीपासून जवळपास १ हजार चिनी सैनिक तिथे होते. उपग्रह फोटोंच्या आधारे रिपोर्टमध्ये हा दावा करण्यात आला. गलवान घटनेच्या दोन आठवडेआधी चिनी सरकारचे मुखपत्र असलेल्या ग्लोबल टाइम्समधून तणाव वाढवण्याचे संकेत देण्यात आले होते.

भारत आणि चीनमधला तणाव अजूनही कायम आहे. दोन्ही बाजूचे ५० हजारच्या आसपास सैनिक पूर्व लडाख सीमेवर तैनात आहेत. रणगाडे, फायटर विमाने, क्षेपणास्त्र दोन्ही बाजूंनी सज्ज ठेवली आहेत. चीन मागे हटत नसल्याने अखेर भारतीय सैन्याने दक्षिण पँगाँग किनाऱ्यावरच्या महत्त्वाच्या टेकडया ताब्यात घेतल्या. रणनितीक दृष्टीने भारताला त्यामुळे चीनवर वरचढ होता आले.