चीन बदलत्या लोकसंख्याशास्त्रावर नियंत्रण ठेवण्यासाठी कठोर प्रयत्न करत आहे. चीनची एक मोठी चिंता म्हणजे देशात तरुणांची घटती संख्या आहे. यासाठी त्यांनी मे महिन्यात आपल्या धोरणात मोठा बदल केला. या बदललेल्या धोरणाअंतर्गत चीनमधील जोडप्यांवर आता तीन मुलांना जन्म देण्यासाठी विविध प्रकारे दबाव आणला जात आहे. या धोरणांतर्गत, चीनच्या स्थानिक सरकारने तिसरे अपत्य असलेल्या जोडप्यांना रोख रक्कम तसेच इतर सुविधा देणे सुरू केले आहे.

चीनच्या गांसु प्रांतातील लिंजे काउंटीने तीन मुलं असलेल्या जोडप्यांसाठी राज्याचा खजिना उघडला आहे. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, येथे जोडप्याचे तिसरे अपत्य जन्माला येताच त्यांना एकहाती ५,००० युआन (सुमारे ५७,००० रुपये) दिले जात आहे.

ही माहिती स्थानिक सरकारने चिनी सोशल मीडिया WeChat वर एका पोस्टद्वारे दिली आहे. एवढेच नाही तर, जेव्हा मूल ३ वर्षांचे होणार आहे, तेव्हा त्याला पहिल्या वर्षी १०,००० युआन (सुमारे १ लाख १४ हजार रुपये) देण्याची तरतूदही करण्यात आली आहे. तसेच स्थानिक अधिकाऱ्यांनी अशा कुटुंबांना शाळेचे शुल्क आणि मुलांसाठी घरे खरेदीचे अनुदान देण्याचे आश्वासन दिले आहे.

चीनमध्ये आता तीन मुलांना जन्म देण्याची परवानगी!

लोकसंख्येवर देशाची आर्थिक गणितं बांधली जात असतात. लोकसंख्येचा थेट प्रभाव अर्थकारणावर पडत असतो. यामुळे लोकसंख्या नियंत्रणात ठेवण्याचं अर्थतज्ज्ञांकडून सुचवलं जातं. चीनने काही वर्षांपासून लोकसंख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी कडक नियम घातले होते.”टू चाइल्ड पॉलिसी’ अंतर्गत दोन मुलांना जन्म देण्याची परवानगी होती. या नियमामुळे देशातील लोकसंख्या नियंत्रणाला आली. मात्र देशातील अर्ध्याहून अधिक नागरिक वयोवृद्ध होत असल्याने चीनची चिंता वाढली आहे. त्यामुळे हा नियम शिथील करण्याचा निर्णय चीन सरकारने घेतला आहे. चीनमध्ये आता दाम्पत्य तीन मुलांना जन्म देऊ शकतात.

गेल्या काही वर्षात चीनमध्ये जन्मदर घटला आहे. तसेच वयोवृद्ध लोकांची संख्या वाढत असल्याचं एका अहवालातून समोर आलं. वयोवृद्ध लोकसंख्येमुळे भविष्यात परिणाम जाणवतील, या भीतीने चीन सरकारने हा निर्णय घेतला आहे. नव्या पॉलिसीला चीनी राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्याकडून मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे चीनमधील टू चाइल्ड पॉलिसी संपुष्टात आली आहे.

चीनमध्ये २०१० ते २०२० या कालावतील लोकसंख्या वाढीचा वेग हा ०.५३ टक्के इतका होता. मागच्या दोन दशकात चीनमधील लोकसंख्येत कमालीची घट झाली आहे. २०२० या वर्षात फक्त १२ दशलक्ष मुलांचा जन्म झाला. २०१८ मध्ये १८ दशलक्ष मुलांचा जन्म झाला होता. मात्र असं असलं तरी जागतिक लोकसंख्या यादीत आताही चीन आघाडीवर आहे. त्या खालोखाल भारत आणि अमेरिकेचा क्रमांक लागतो. वर्ल्डोमीटर या वेबासाईटवर ही माहिती देण्यात आली आहे.