दावोसमध्ये जागतिक अर्थ परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या भाषणाची जगभरात चर्चा होत आहे. यामधील विशेष बाब म्हणजे भारताचा सर्वात मोठा विरोधक असलेल्या चीनने देखील अप्रत्यक्षपणे मोदींच्या भाषणाचे कौतुक केले आहे. मोदींनी आपल्या भाषणात संरक्षणवादाला दहशतवादाप्रमाणेच धोकादायक असल्याचे म्हटले होते. त्याचबरोबर चीनने ग्लोबलायझेशनच्या प्रक्रियेला सक्षम करण्यासाठी भारतासोबत सहकार्य वाढवण्यावर जोर देणार असल्याचे सांगितले होते. मोदींनी आपल्या भाषणात दहशतवाद आणि जलवायू परिवर्तनाच्या आव्हानांवरही चिंता व्यक्त केली होती.

चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते हुवा चुनयिंग यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संरक्षणवादाविरोधात बोलले आहेत. यावरुन हे लक्षात येते की, ग्लोबलायझेशन काळाची गरज आहे. तसेच यातच सर्व देशांचे हित आहे. संरक्षणवादाविरोधात लढण्याची आणि ग्लोबलायझेशनचे समर्थन करण्याची गरज आहे. त्यांनी सांगितले की, चीन ग्लोबलायझेशनची प्रक्रिया आणखी सक्षम करण्यासाठी भारत आणि इतर देशांसोबत काम करण्यास उत्सुक आहे.

चीनच्या या आश्चर्यचकित करणाऱ्या वक्तव्यापूर्वी माध्यमांनी देखील मोदींच्या या भाषणाचे कौतुक केले होते. जगातिल अनेक प्रतिष्ठीत माध्यमांनी मोदींचा फोटो पहिल्या पानावर छापला होता.