डोक्लाम प्रश्नावरुन भारत- चीनमध्ये तणाव निर्माण झाला असतानाच रविवारी चिनी सैन्याने शक्तिप्रदर्शन केले. शत्रूंचा पराभव करण्याची चिन्ही सैन्यात क्षमता असून सैन्याने युद्धासाठी तयार राहावे असे चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी म्हटले आहे. जिनपिंग यांनी अप्रत्यक्षपणे भारताला इशारा दिला असून यामुळे दोन्ही देशांमधील तणावात भर पडली आहे.

डोक्लाम प्रश्नावरुन भारत- चीनमध्ये गेल्या काही दिवसांपासून तणाव निर्माण झाला आहे. भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हे चीन दौऱ्यावर जाऊन आले. ब्रिक्स देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांच्या बैठकीनंतर डोवाल यांनी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी चर्चा केली होती. डोवाल भारतात परतले असतानाच जिनपिंग यांनी पुन्हा एकदा भारतावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे.

पीपल्स लिबरेशन आर्मीच्या (पीएलए) स्थापनेला ९० वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त उत्तर चीनमध्ये चिनी सैन्याने परेडचे आयोजन केले होते. या सोहळ्यात चिनी सैन्याने शक्तिप्रदर्शनच केले. अण्वस्त्रवाहू क्षेपणास्त्र, रणगाडे, लढाऊ विमाने या परेडमध्ये सहभागी झाली होती. विशेष म्हणजे शी जिनपिंग हेदेखील सोहळ्याला हजर होते. त्यांनी सैन्याचा आढावा घेतल्यानंतर सैनिकांना संबोधित केले. संपूर्ण भाषणात जिनपिंग यांनी थेट भारताचा उल्लेख केला नाही.

जिनपिंग म्हणाले, सैन्याने नेहमीच युद्धासाठी तयार राहायला पाहिजे. सैनिकांनी स्वतःला अशा पद्धतीने तयार केले पाहिजे की ज्यामुळे देशाचे सैन्य जगातील सर्वात शक्तिशाली सैन्य ठरेल. चिनी सैन्य फक्त युद्धासाठी सक्षम नसेल तर शत्रूंचा पराभवदेखील करु शकेल असे त्यांनी सांगितले. चिनी सैन्यामध्ये शत्रूंचा पराभव करण्याची क्षमता आणि आत्मविश्वास आहे असे त्यांनी नमूद केले. सुमारे १० मिनिटे त्यांनी जवानांना संबोधित केले. या सोहळ्यात जिनपिंग सैनिकांच्या वेशात सोहळ्याला उपस्थित होते. यापूर्वी चिनी सैन्याच्या प्रवक्त्यांनीदेखील भारताला इशारा आहे. पर्वताला हलवणे एकवेळ सोपे आहे. पण चीनच्या सैन्याला हलवणे सोपे नाही. त्यामुळे भारताने डोक्लाममधून मागे हटावे, असे आव्हानच चीनच्या लष्करी प्रवक्त्याने दिले होते.