चीनच्या अध्यक्षांचे ट्रम्प यांच्यावर टीकास्त्र 

बीजिंग : अमेरिकेने चिनी वस्तूंवरील आयात करात वाढ केल्याच्या पाश्र्वभूमीवर चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. एखाद्या नागरी संस्कृतीच्या श्रेष्ठत्वाची कल्पना बाळगणे हा मूर्खपणा असून कोणताही देश अन्य देशांपासून पूर्णत: वेगळा राहू शकत नाही, उर्वरित जगासाठी आपली दारे बंद करू शकत नाही, असे क्षी यांनी म्हटले आहे.

बीजिंगमध्ये सुरू असलेल्या आशियाई संस्कृतींवरील परिषदेच्या उद्घाटन समारंभात क्षी बोलत होते. ट्रम्प यांनी शुक्रवारी चिनी वस्तूंवरील आयात कर १० टक्क्यांवरून २५ टक्क्यांवर वाढविण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर चीन आणि अमेरिका यांच्यात सुरू झालेल्या व्यापार युद्धात क्षी यांनी दिलेली ही पहिलीच प्रतिक्रिया आहे. अमेरिकेमध्ये चिनी वस्तूंची बाजारपेठ ही सुमारे २०० कोटी अमेरिकी डॉलरची आहे.

अमेरिकेच्या कृतीला प्रत्युत्तर म्हणून चीननेही अमेरिकी वस्तूंवरील आयात कर वाढविला आहे. चीनमधील अमेरिकी वस्तूंची बाजारपेठ सुमारे ६० कोटी अमेरिकी डॉलरची आहे.

‘प्रत्येक देशाने स्वत:ला इतरांपासून वेगळे पाडले तर, संस्कृतींचा ऱ्हास होईल. कोणतीही एक संस्कृती इतरांपेक्षा श्रेष्ठ नाही. एखादा वंश किंवा संस्कृती दुसऱ्यापेक्षा श्रेष्ठ समजणे हे मूर्खपणाचे आहे. इतरांवर आपली संस्कृती लादणे किंवा दुसऱ्याची संस्कृती बदलू पाहणे हे अनर्थकारक ठरते,’ असे क्षी यांनी म्हटले आहे.

या परिषदेला श्रीलंकेचे अध्यक्ष मैत्रिपाल सिरीसेना, ग्रीसचे अध्यक्ष प्रोकोपिस पाव्हलोपोलस, कंबोडियाचे राजे नोरोडम सिहामोनी, सिंगापूरच्या अध्यक्ष हलिमा याकूब आणि आर्मेनियाचे पंतप्रधान निकोल पेशीयान, भारतीय दूतावासाचे प्रमुख अ‍ॅक्विनो विमल उपस्थित होते.