भारताला वाटणाऱ्या चिंतेकडे दुर्लक्ष करून पाकिस्तानातील सामरिक महत्त्वाच्या अरबी समुद्रावरील ग्वादार बंदराला पाकव्याप्त काश्मीरमार्गे चीनच्या झिनजियांग प्रांताला जोडणाऱ्या तब्बल ४६ अब्ज अमेरिकी डॉलर्स गुंतवणुकीच्या चीन-पाकिस्तान आर्थिक मार्गाचे (इकॉनॉमिक कॉरिडॉर) चीनचे अध्यक्ष झि जिनपिंग हे त्यांच्या पाक दौऱ्यात उद्घाटन करणार आहेत. आतापर्यंतची सगळ्यात मोठी विदेशी गुंतवणूक असलेला हा मार्ग आहे.
चीनचे अध्यक्ष येत्या सोमवारपासून पाकिस्तानच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर जात आहेत. चीनमधील मुस्लीमबहुल असलेल्या झिनजियांग प्रांतातील अशांतता आणि पाकिस्तानमध्ये तालिबानचा धोका याबाबत सुरक्षाविषयक गंभीर चिंता असतानाही हा प्रकल्प पुढे रेटण्याचे त्यांनी ठरवले आहे.
चीन व पाकिस्तानदरम्यान १९७९ साली बांधल्या गेलेल्या काराकोराम महामार्गानंतर हा आर्थिक मार्ग दोन्ही देशांदरम्यानचे दळणवळण वाढवणारा सगळ्यात मोठा प्रकल्प आहे. मध्यपूर्वेतील देशांमधून ऊर्जाविषयक उत्पादने निर्यात करण्यासाठी जवळचा मार्ग असावा या आकांक्षेतून चीनने तो बांधला आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on April 18, 2015 2:48 am