बीजिंग : करोना विषाणूचा उगम शोधून काढण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेच्या तज्ज्ञांच्या पथकाला प्रवेश देण्यास चीन तयार असून, याबाबत या संघटनेशी आपले मतैक्य झाले आहे, असे चीनच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने शनिवारी सांगितले; मात्र या भेटीची नेमकी मुदत मात्र त्याने सांगितली नाही.
गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये जेथे करोना विषाणू सर्वप्रथम आढळला, त्या वुहान शहरात जागतिक आरोग्य संघटनेच्या तज्ज्ञांचे पथक येण्याची नेमकी वेळ, तसेच त्यांचा करोनाच्या उगमाबाबतचा तपास याबाबत अद्याप चर्चा सुरू आहे, असे राष्ट्रीय आरोग्य आयोगाचे उपप्रमुख झेंग यिक्झिन यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. जागतिक आरोग्य संघटनेतील आपल्या समपदस्थांची चीनमधील तज्ज्ञ वाट पाहात असल्याचे ते म्हणाले.
या तपासाबाबतचे नेमक्या तपशीलांबाबत चार दूरचित्रसंवादांच्या माध्यमातून चीन व जागतिक आरोग्य संघटनेचे मतैक्य झाले, असे झेंग यांनी म्हटल्याचे वृत्त ‘ग्लोबल टाइम्स’ या सरकारी माध्यमाने दिले.
जागतिक आरोग्य संघटनेच्या तज्ज्ञांनी एकदा त्यांच्या प्रक्रिया पूर्ण करून वेळापत्रकाला अंतिम स्वरूप दिले, की चीनचे तज्ज्ञ तपासाकरता त्यांच्यासोबत वुहानला जातील, असे झेंग यांनी म्हटल्याचे वृत्त ‘झिन्हुआ’ या सरकारी वृत्तसंस्थेने दिले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 10, 2021 1:23 am